पिंपरी (प्रतिनिधी) -तुरूंगातून सुटण्यासाठी मित्राने जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली. त्याची परतफेड म्हणून मित्राच्या शत्रूचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे शुक्रवारी (दि. 5) रात्री घडला. वाकड पोलिसांनी अवघ्या चार तासात चार आरोपींना अटक केली आहे.
ऋषभ बालाजी गायकवाड ( रा. जगतापनगर, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुंड्या ऊर्फ किशोर ज्ञानदेव शेलार (रा. दुर्गा कॉर्नर बिल्डिंग, लिंकरोड, चिंचवड) सीजीन फिलिप जॉर्ज ( रा. जोतिबा मंगल कार्यालयामागे, काळेवाडी) रोहित ललन सिंग ( रा. पवनानगर कॉलनी, काळेवाडी) आणि सचिन सोनू साठे (रा. गणराज कॉलनी, काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या भांडणात ऋषभने केलेल्या मारहाणीमुळे आरोपी जॉर्ज याच्या अंगावर व्रण उठला होता. याची आरोपी जॉर्जला सल होती. आरोपी जार्जने गुंड्या याला जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली होती. या उपकाराची परतफेड आरोपी गुंड्या याला करायची होती.
सर्व आरोपींनी एकत्र येत ऋषभ याचा काटा काढण्याचे निश्चित केले. दोन-तीन वेळा त्यांनी प्रयत्नही केला. शुक्रवारी रात्री आरोपी पुन्हा एकत्र जमले. त्यावेळी त्यांनी संधी मिळताच थेरगाव येथे ऋषभ याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन त्याचा खून केला.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक हरीश माने, महेश स्वामी, अविनाश पवार, तानाजी भोगम, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.