Eiffel Tower : फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये आयफेल टॉवर जवळ एका तरुणाने ‘अल्ला हू अकबर’चे नारे देत तीन पर्यटकांवर चाकू हल्ला केला. या घटनेत एका जर्मन तरुणाचा मृत्यू झाला. इतर दोन पर्यटक गंभीर रित्या जखमी झाले आहेत. फ्रान्सचे गृहमंत्री गेरॉल्ड डर्मेनिन यांनी हल्लेखोराला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली आहे.
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पोलिसांनी हल्लेखोराची चौकशी सुरु असून त्याने अफगाणिस्तान आणि पॅलेस्टाईन या ठिकाणी मुस्लीम धर्माचे लोक मारले जात आहेत त्यामुळे आपण अस्वस्थ झालो असून हा हल्ला केला असल्याचे म्हटले आहे.
स्थानिक वृत्तसंस्थेने याविषयी काहीही स्पष्ट केलेले नाही. तर गृहमंत्र्यांनी, “या प्रकरणी हल्लेखोराची चौकशी सुरु आहे त्यातून लवकरच योग्य ती माहिती मिळेल.” असे म्हटले आहे.
गृहमंत्री गेरॉल्ड डर्मेनिन यांनी या हल्ल्यासंदर्भात बोलताना,”पॅरिसमध्ये शनिवारी रात्री ९ च्या सुमारास एका हल्लेखोराने एका विदेशी पर्यटक जोडीवर हल्ला केला. त्यानंतर आणखी एकावर हल्ला केला”. फिलिपीन्समधल्या एका जर्मन पर्यटकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्याच्यावर हल्लेखोराने चाकू हल्ला केला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले आणि या हल्लेखोराचा पाठलाग करुन त्याला अटक केली.