पिंपरी – चवीला काहीसा कमी तिखट, आकाराने मध्यम व देशी कांद्याच्या तुलनेत कमी दर असलेला इजिप्तचा कांदा मोशीतील श्री नागेश्वर उपबाजारात दाखल झाला आहे. दिवसभरात 15 पिशव्यांची आवक झाली असून, कुतुहलापोटी ग्राहकांकडून हा कांदा खरेदी केला जात आहे.
देशभरात कांद्याचा तुटवडा भासू लागल्याने कांद्याच्या प्रतिकिलो दराने शंभरी गाठली होती. त्यामुळे केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीला परवानगी दिली आहे. त्यानुसार गेली दीड महिन्यापासून अफगाणिस्तान व इजिप्तहून कांद्याची आवक होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा कांदा दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यात इजिप्तमधील कांदा वाशीतील डॉकयार्डमध्ये दाखल झाल्यानंतर वाशी व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात दाखल झाला होता. त्यानंतर मोशीतील बी.टी. कंपनीचे संचालक संतोष थोरात यांनी वाशीहून हा कांदा मागविला आहे. या कांद्याच्या 15 पिशव्या आवक झाली आहे. देशी कांद्यासारखा गुलाबी रंगाचा व मध्यम आकार, मात्र चवीला कमी तिखट असलेला कांदा जवळपास आठवडाभर उशिराने मोशी बाजारात दाखल झाला आहे.
सध्या किरकोळ बाजारात देशी कांद्याची 40 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर इजिप्तहून दाखल झालेल्या कांद्याला प्रतिकिलो 30 ते 35 रुपये दर मिळाला आहे. तर परदेशातील कांदा म्हणून ग्राहकांकडून उत्सुकतेपोटी या कांद्याची किलो दोन किलो खरेदी केली जात आहे.
– संतोष थोरात
संचालक बी.टी. कंपनी, मंचर