पिंपरी – लिंगायत गवळी समाजाचा सगर हा पारंपारिक उत्सव करोनामुळे रद्द करण्यात आला आहे. पाडव्यानिमित्त येत्या सोमवारी (दि.16) सगर उत्सव साजरा केला जाणार होता.
लिंगायत समाजाचा परंपरागत दुधाचा व्यवसाय असल्याने, पाडव्याच्या दिवशी या समाजाकडून गाई, म्हशी व रेड्यांची रंगरंगोटी करुन, अंगावर नक्षीकाम करुन अंगारव झुल टाकत पारंपारिक पद्धतीने पुजा करुन मिरवणुक काढली जाते. त्यानंतर श्रीकृष्णाचे प्रतिक मानुन धोंड्याला सलामी दिली जाते. यावेळी गुळ-खोबऱ्याचा प्रसाद वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला जातो. अशा पद्धतीने या समाजाच्या वतीने हा सगर सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. दरवर्षी जनावरांची काढली जाणारी मिरवणूक शहरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण असते.
पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड स्टेशन परिसरात लिंगायत गवळी समाजाची लोकसंख्या अधिक असल्याने याठिकाणी दरवर्षी सगर सण साजरा केला जातो. याकरिता नागरिकांनी तयारीदेखील केली होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
सगर सण मर्यादित स्वरुपात साजरा करण्यासाठी लिंगायत समाजातील नागरिक आग्रही होते. मात्र पोलीस प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर पोलिसांच्या आवाहनाला समाजातील नागरिकांनी प्रतिसाद देत यंदाचा सार्वजनिक सगर उत्सव रद्द केला आहे. याऐवजी प्रत्येकाने आपल्या घरात जनावरांची प्रतिकात्मक पूजा अथवा गोठ्यामध्ये जनावरांची पूजा करुन त्यांना गोडाचा घास भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– गणेश लंगोटे
अध्यक्ष, पिंपरी–चिंचवड गवळी समाज