नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने उद्योगपती रतुल पुरी यांना सक्त वसुली संचलनालयाच्या 6 दिवसांच्या कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला आहे.
सुमारे 3,600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारातील मनी लॉंडरिंगप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने रतुल पुरी यांना बुधवारी अटक केली होती. त्यानंतर “ईडी’च्या एक दिवसांच्या कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती.
दरम्यान बॅंक गैरव्यवहार प्रकरणी रतुल पुरी यांना 17 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. रतुल पुरी हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आहेत. ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणी आत्मसमर्पण करायला आपण तयार असल्याचे त्यांनी यापूर्वी न्यायालयात सांगितले आहे.
इटलीस्थित फिनमेकॅनिका कंपनीची ब्रिटनमधील संलग्न कंपनी ऑगस्टावेस्टलॅन्डकडून 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीमधील मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित हे प्रकरण आहे. करारभंग आणि व्यवहारासाठी दलाली दिल्याच्या आरोपावरून या कंपनीबरोबरचा व्यवहार “एनडीए’ सरकारने 2014 मध्ये रद्द केला होता.