नवी दिल्ली: दरभंगादरम्यान धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसला बुधवारी रात्री आग लागण्याची दुर्घटना घडली. ही रेल्वे गाडी बिहारमधील दरभंगाहून नवी दिल्लीकडे रवाना होणार होती. मात्र, अचानक रेल्वेच्या एस-6 बोगीने पेट घेतला. आग लागल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बिहारमधील दरभंगाहून संपर्क क्रांती एक्स्प्रेस नवी दिल्ली रवाना होणार होती. दरम्यान, आठ वाजेच्या सुमारास गाडीच्या एस-6 बोगीला आग लागली. आग लागल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांसह आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) आणि जीआर (गव्हर्मेंट रेल्वे पोलीस) जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ही आग रात्री 11 वाजता आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. ही आग
बेकायदेशीर कृत्य केल्यानेच लागली असल्याचे प्राथमिक पाहणीतून दिसून निदर्शनास येते आहे. आगीच्या कारणाची चौकशी करण्याचे आदेश सहसचिव श्रेणीतील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पूर्व मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेस दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.