मॉस्को – युक्रेनच्या कैद्यांना घेऊन जाणारे रशियाच्या लष्कराचे विमान रशियाच्याच हद्दीमध्ये कोसळले आहे. युक्रेनच्या हद्दीजवळ कोसळलेल्या या विमानातील बहुतेक सर्वजण मरण पावल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. बेलगोरोड प्रांतात झालेल्या या विमान अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
या विमानामध्ये नक्की किती प्रवासी होते, हे मात्र गव्हर्नर वॅचेस्लाव ग्लाडकोव यांनी स्पष्ट केले नसले तरी विमानात युक्रेनचे ६५ कैदी होते अशी माहिती मिळते आहे. त्रयस्थ वृत्तसंस्थेकडूनही या कैद्यांची ओळख स्पष्ट केली जाऊ शकली नाही. या विमानातून युक्रेनच्या कैद्यांना सीमाभागात कैद्यांच्या आदला बदलीसाठी नेले जात होते, असे रशियातील सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
ग्रामीण आणि बर्फाळ भागात विमान पडत असतानाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विमान जमिनीवर कोसळताच प्रचंड स्फोट झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. बेलोगोरोड प्रांतातील कोरोचान्स्की जिल्ह्यात झालेल्या या अपघाताच्या ठिकाणी मदतीसाठी फायर फायटर, रुग्णवाहिका आणि पोलीस तातडीने रवाना झाले आहेत.
हे विमान युक्रेनच्याच क्षेपणास्त्रांनी पाडले गेल्याचा आरोप रशियाच्या दोन वरिष्ठ अधिकार् यांनी केला आहे. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही. या प्रांतात क्षेपणास्त्रांचा हल्ला होण्याचा इशारा बेलगोरोडचे गव्हर्नर वॅचेस्लाव ग्लाडकोव यांनी एक दिवस आगोदरच दिला होता. नागरिकांनी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी भूमिगत भुयारांमध्ये आश्रय घ्यावा, असे त्यांनी म्हटले होते.
युक्रेनमधील कैद्यांच्या उपचारसाठीच्या मुख्यालयाकडूनही या विमान अपघाताबाबतचा पूर्णतपशील उपलब्ध करून दिला गेलेला नाही. या विमान अपघाताबाबतची माहिती मिळवली जात आहे, असे या मुख्यालयाने म्हटले आहे. दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या प्रवक्त्याने देखील पूर्ण माहिती उपलब्ध नसल्याने या विमान अफगाताबाबत काही प्रतिक्रीया देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.