पिंपरी – काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक शाळेतील वादग्रस्त प्रकरणात अर्थपूर्ण संबधाची तक्रार मच्छिंद्र तापकीर यांनी पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारींबाबत पोलिसांनी अहवाल मागितल्याने महापालिकेच्या शिक्षण विभाग प्रमुख ज्योत्सना शिंदे यांची चौकशी होणार आहे.
भाऊसाहेब तापकीर प्राथमिक शाळा शंभर टक्के अनुदानित असून शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ या संस्थेतर्फे चालविली जाते. या शाळेतील मुख्याध्यापिका व उपशिक्षिका बडतर्फ असताना वेतन प्राप्त करून घेण्यासाठी अर्थपूर्ण संगनमत झाल्याची तक्रार संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती.
आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत ताबोडतोब राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालयाकडे चौकशी अहवाल मागितला आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांबरोबर अर्थपूर्ण संगनमत करुन पद आणि अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या व कार्यकक्षेबाहेर जाऊन आदेश पारित केल्याची तक्रार ज्योत्स्ना शिंदे यांच्या विरोधात आहे. त्या अनुशंगाने त्यांची चौकशी होणार आहे.
यामध्ये त्या दोन्ही भावांचा वाद आहे. त्यांच्या परस्पर विरोधी 19 केस न्यायालयात प्रलंबित आहेत. दोन्ही भावांच्या वादामध्ये त्यांनी प्रशासनाला घेतले आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल कायदा विभागाकडे पाठविला आहे.
– ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी