पिंपरी – शहरात दररोज सरासरी 800 ते 900 करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे करोनासाठी विशेष स्वतंत्र निधी तयार केला जाणार आहे. त्यासाठी भांडवली विकासकामांवर तरतूद केलेल्या रकमेतून 78 कोटी रुपयांचा निधी वळविण्यात येणार आहे.
करोनाला रोखण्यासाठी महापालिकेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या खर्चासाठी भांडार विभागाकडे “करोना निधी’ हे लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे. कोविड-19 मुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या खर्चासाठी प्राधान्याने तरतुदी खर्च कराव्यात, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महापालिकेच्या विविध विभागांनी खर्चासाठी लेखा विभागाकडे निधीची मागणी केलेली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष स्वतंत्र निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे.
त्यानुसार शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, सद्य:स्थितीत तातडीने निधी आवश्यक असल्याने 2020-21 च्या अंदाजपत्रकातील भांडवली विकासकामांसाठी केलेल्या 404 कोटी 99 लाख रुपयांच्या तरतुदीतून 78 कोटी रुपयांचा निधी करोनासाठी वळविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
स्मार्ट सिटीतील 25 कोटीचा निधीही वळविणार
महापालिकेकडून स्मार्ट सिटीसाठी वर्ग करण्यात येणाऱ्या 150 कोटी रुपयांच्या निधीतून करोनाच्या विशेष निधीसाठी 25 कोटी रुपये वळविण्यात येणार आहे. त्याशिवाय, रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, रस्त्यांची कामे, सुशोभीकरण, बोपखेल येथील मुळा नदीवर पुल बांधणे, इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाचे स्ट्रॅक्चरल ऑडिट व दुरुस्ती, खडकी कॅन्टोन्मेंट क्षेत्रात बोपखेल गावासाठी पोहच रस्ता बांधणे, रहाटणी येथे कोकणे चौक ते काळेवाडा फाटापर्यंत उच्च क्षमता द्रुतगर्ती मार्ग (एचसीएमटीआर) विकसित करणे आदी विविध कामांतून कोट्यावधी रुपयांचा निधी कमी करून करोनासाठी वळविला जाणार आहे.