सासवड (पुणे) – सासवडमध्ये शाखा अभियंत्यांना निवासस्थानाचा ‘विसर’ या मतळ्याखाली दैनिक ‘प्रभात’मध्ये गुरुवारी (दि. 10) वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत कार्यकारी अभियंता ए. डी. वनमोरे यांनी शाखा अभियंत्यांकडे खुलासा मागितल्यानंतर काही शाखा अभियंत्यांनी कागदावरच निवासस्थाने दाखवली असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड उपविभागामध्ये पुरंदर, दिवे, खळद, राजेवाडी, वाघापूर, चांबळी आणि सासवड, अशी सात शाखा कार्यालये आहेत. यापैकी पुरंदर, दिवे, खळद ही तीन शाखा कार्यालय तर सासवडच्या मुख्य कार्यालयातच असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही कार्यालय प्रत्येक शाखेच्या ठिकाणी हलवण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.
कार्यकारी अभियंता यांना लिहून दिलेल्या आधारे शाखा अभियंता ए. जी. जाधव (राजेवाडी), व्ही. एस. सोनवणे (वाघापूर), ए. बी. आलदार (पुरंदर), पी. सी. पवार (खळद) या शाखा अभियंत्यांच्या निवासस्थानाची चौकशी केली असता. त्या ठिकाणी हे शाखा अभियंता राहत नसल्याचे नागरिक व पोलीस पाटील यांनी सांगितले. त्यामुळे कोण खरे कोण खोटे हे समजण्यापलिकडचे असल्याचे ग्राहक हक्क संरक्षण समितीचे पुरंदर तालुकाध्यक्ष महेश राऊत यांनी स्पष्ट केला आहे.
- झिरो वायरमनचा सुळसुळाट
शाखा अभियंता त्यांच्या निवास्थानी राहत नसल्याने त्यांच्या हाताखाली वायरमन हे देखील नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाहीत. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील विद्युतपुरवठा हा देखील रामभरोसे झाला आहे. प्रत्येक वायरमन त्यांच्या हाताखाली गावातील “झिरो वायरमन’ ही नवीन संकल्पना उदयास आणून त्यांच्याकडून सर्व कामकाज करून घेतले जात आहे. “झिरो वायरमन’ हे ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत असल्याचा देखील प्रकार अनेकवेळा पुढे आला आहे. यावर देखील कोणत्याही शाखा अभियंत्याचे नियंत्रण नाही.
संबंधित शाखा अभियंत्यांनी लिहून दिलेल्या ठिकाणी महावितरणचे पथक शहानिशा करण्यासाठी पाठवणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
– एन. डी. वनमोरे, कार्यकारी अभियंता, पुरंदर