पुणे – राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांतील कारभारात पारदर्शता येण्याऐवजी “भ्रष्ट’ कारभाराचीच अधिक कीड लागली आहे. अधिकारी व कर्मचारी लाच घेतला रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान “एसीबी’च्या पथकांकडून शिक्षण विभागातील विविध कार्यालयांवर “करडी’ नजर ठेवण्यात येणार आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एका शिपायाला 26 हजार रुपयांची लाच घेताना डिसेंबर 2019 मध्ये रंगेहाथ पकडले होते. यात तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालकालाही अटक झाली होती.
या कार्यालयातील या प्रकरणांचा तपास “एसीबी’कडून सुरू आहे. मागच्या महिन्यात पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील एका सहायक प्रशासकीय अधिकाऱ्याला 50 हजाराची लाच घेताना पकडले होते. त्यानंतर मागच्याच आठवड्यात नाशिक जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याला 8 लाख रुपयांची लाच घेताना पकडले. या सर्वच घटनांमुळे शिक्षण विभागाला काळीमाच लागला आहे.
राज्यात प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे आदी कार्यालये आहेत. यातील बहुसंख्य कार्यालयांत विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, संस्था व संघटनांचे पदाधिकारी काही ना काही प्रकरणे दाखल करत असतात. त्यावर काही तरी त्रुटी काढून टोलवाटोलवी केली जाते.
फायलीवर आर्थिक “वजन’ ठेवल्यानंतर त्या निकाली निघतात. बऱ्याचशा कार्यालयात व आवारात एजंट तळ ठोकून असतात. पुण्यातील एका शिक्षणाधिकारी कार्यालयातील कारभार तर चक्क एका स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या उपशिक्षणाधिकाऱ्यांच्याच सल्ल्यानुसार चालतो, असे शिक्षक, कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. आर्थिक गुन्हे शाखेकडूनही काही प्रकरणांचा तपास सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याचा गोपनीय पद्धतीने तपास करून कठोर कारवाई करण्यात येते. शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराच्या काही प्रकरणांचा तपास सुरू आहे. कोणत्याही कार्यालयातील गडबडीच्या कामकाजाबाबत ठोस पुराव्यासह संबंधितांनी पुढे येऊन अधिकाधिक तक्रारी दाखल करायला पाहिजेत. तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेऊन “वॉच’ ठेवून योग्यवेळी कारवाई करण्यात येईल.
– राजेश बनसोडे, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे