“चूल पेटेना अन् भाकरी भाजेना..’ वाढत्या गॅसदरामुळे जनता हतबल

राहुल गणगे
पुणे-सध्या पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यामुळे विनाअनुदानित सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. मागील आठ ते नऊ महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत 165 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आहे. सोमवारी रात्रीपासूनच ही दरवाढ लागू झाली आहे.
त्यानुसार आता घरगुती गॅस सिलिंडरसाठी 859 रुपये किंमत मोजावी लागणार आहे. एकीकडे सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना सरपण मिळत नाही. त्यातच दुसरीकडे घरगुती गॅसचे दर वारंवार गगनाला भिडू लागले आहेत. यामुळे चूल पेटेना अन् भाकरी भाजेना अशी अवस्था ग्रामीण भागातील नागरिकांची झाली आहे.
इंधन दरवाढीने आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्यांना गेल्या आठ महिनेयांपासून वारंवार गॅस दरवाढीचा झटका बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरांत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे.
गेल्या महिन्यात गॅसची किंमत 834 रुपये इतकी होती. आता यामध्ये थेट 25 रुपयांनी वाढ झाली असून गॅस 859.5 रुपयांना मिळणार आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. एक जानेवारी 2021 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये प्रति सिलिंडर होती. 1 मार्च 2021 पर्यंत ही किंमत 819 वर पोहचली होती. एप्रिल महिन्यात त्यात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यात सिलिंडरचा भाव 810 रुपये झाला होता.
माहितीही देईना आणि सबसिडीही मिळेना
करोनाचे संकट, गॅस, इंधनाचे वाढते दर आणि महागाईमुळे सर्वसामान्य अडचणीत आहेत. सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी गावागावांतील नागरिकांसह विरोधकांकडून होत आहे. परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांसह जनतेच्या मागणीवर एक पैसाही करातून सुट मिळणार नाही, असे सुनावत एका वाक्यात पाणी फिरवले आहे.
गॅसच्या सबसिडीबाबत 18002333555 या क्रमांकावर संपर्क साधला असता याबाबत टेक्निकल अडचणी आहेत. तसेच आपणांस 24 तासांनी माहिती दिली जाईल. असे उत्तर मिळत आहे. एकीकडे नागरिक गॅसची सबसिडी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
तर दुसरीकडे गॅससह इंधनाच्या किंमती कमी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे वाढत्या महागाईत सर्वसामान्य होरपळून निघत आहेत. सध्या वाढत्या दरामुळे गृहिणींना आपले बजेट शेगडीच्या कोळशात घालावे लागण्याची वेळ आली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून घरगुती गॅसची सोन्याच्या भावासारखी वारंवार दरवाढ होत आहे. यामध्ये गॅस बंद करून चूल पेटवायची म्हटलं तर पावसामुळे सरपण मिळत नाही. त्यामुळे विझलेल्या चुलीत पाणी ओतल्यासारखी सर्वसामान्य जनतेची अवस्था होऊन बसली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून गॅस, इंधन दरवाढीबाबत विचार करण्याची गरज आहे.
– विठ्ठल शितोळे, सरपंच कोरेगाव मूळ





