-->

62 वर्षांपूर्वी प्रभात : कोयनेची वीज पूर्व व दक्षिण महाराष्ट्राला निर्बाध मिळणार

ता. 22, माहे फेब्रुवारी, सन 1959

कोयनेची वीज पूर्व व दक्षिण महाराष्ट्राला निर्बाध मिळणार

पुणे, ता. 21 – कोयना योजनेला जागतिक बॅंकेकडून मिळावयाच्या कर्जासंबंधी चालू असलेल्या वाटाघाटी पूर्ण करण्यासाठी मुंबई राज्याच्या बांधकाम खात्याचे सेक्रेटरी एस. जी. बर्वे व कोयना योजनेचे चीफ इंजिनिअर मूर्ती पुढील आठवड्यात अमेरिकेकडे रवाना होतील.

कोयनेची वीज पूर्व व दक्षिण महाराष्ट्राला पुरविण्यासाठी आखण्यात आलेली कऱ्हाड सोलापूर योजना 1961च्या आत पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई सरकारने केला आहे. ही योजना पूर्ण झाली म्हणजे वीज वाटपाचा कारभार पुढे या बोर्डाकडे जावयाचा आहे. काही संदिग्धता निर्माण झाल्यामुळेच, मध्यंतरी अडचण निर्माण झाल्यासारखे वाटत होते पण तिचे निराकरण आता झाले आहे.

स्वर्गस्थ कवी डांटे यांस

लंडन – सुप्रसिद्ध इटालियन कवी डांटे 638 वर्षांपूर्वीच मरण पावले आहेत, पण अद्यापही त्यांच्या नावाने पत्रे आहेत. जर्मनीतील न्यूरेंबर्ग येथील मध्यम वयाच्या माणसाला इटलीतून एक पत्र आले. त्याचे उत्तर इटालयीन भाषेतच लिहावे, असा त्यांचा मानस होता. त्याचा भाषांतरकाराचा शोध निष्फळ ठरल्यावर त्याने “हर डांटे अलघिरी’ याला पत्र टाकून भाषांतराचे कामी मदत करण्याची विनंती केली व योग्य ती फी देण्याची तयारी आहे असे पत्राद्वारे कळविले. ते पत्र “डांटे मंदिरात’ आले. अधिकारी प्रथम गडबडले. पण पत्र पाहून त्यांनी खसखस पिकविली. अधिकाऱ्यांनी त्याचे काम विनामूल्य करून द्यायचे ठरविले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पदवी परत देणार

मुंबई – नाशिक खून व कटाच्या खटल्यानंतर (1911) मध्ये परत घेतलेली बीए ची पदवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना परत देण्याविषयी मुंबई विद्यापीठ विचार करते आहे, असे विद्यापीठाचे रेक्‍टर गोवर्धन पारीख यांनी खास पदवीदान प्रसंगी सांगितले. सावरकर यांना पदवी परत देता येईल की नाही अशी विचारणा करणारे एका सिनेट सभासदाचे पत्र आले आहे, असे पारीख यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.