अबाऊट टर्न : बोली

  • हिमांशू

कोणे एके काळी माणसांचा व्यापार होत असे, हे लहानपणी शाळेच्या पुस्तकात वाचताना अंगावर काटा यायचा. माणसांची बोली लागायची, खरेदी-विक्री व्हायची आणि मग संबंधित माणूस गुलाम म्हणून आपल्या मालकाची सेवा करायचा. माणसांची बोली लागणं, या संकल्पनेतील भयावहता आयपीएलने म्हणजे इंडियन प्रीमिअर लीगने खऱ्या अर्थानं कमी केली. कोणाची बोली किती लागली, हे आपण चवीनं ऐकू, पाहू, वाचू लागलो. त्यावर रसभरीत चर्चा करू लागलो. अर्थात, ही काही गुलामी नव्हे, तर एका सीझनपुरता एक खेळाडू “बुक करणं’ एवढीच या बोलीची व्याप्ती. पण तरीसुद्धा लिलाव होतो आणि सगळ्यात जास्त बोली लावून खिशात हात घालणारा इसम अखेर संबंधित खेळाडूला खिशात टाकतो, हे अजूनही फारसं मानवत नाही. मुळात क्रिकेटचे “असे’ सामने बघण्याची सवय आयपीएलच्या इतक्‍या सीझननंतरसुद्धा आम्हाला लागलेली नाही. “आज कोण कुणाविरुद्ध खेळतंय,’ या प्रश्‍नापासून आमची “इनिंग’ सुरू होते आणि दोन्ही संघांची नावं ऐकल्याबरोबर “विकेट’ पडते. कारण संघांची नावं लक्षात ठेवता-ठेवता सामना संपतो. शिवाय आयपीएल स्पर्धेतल्या संघांचे वेगवेगळ्या रंगांचे पोशाख बऱ्याच वेळा आमच्या डोळ्यांवर आघात करतात. विशेषतः सोनेरी हेल्मेटं घालणारे खेळाडू तर थेट अलेक्‍झांडरच्या किंवा कौरवांच्या सैन्यातले वाटतात. कदाचित आयपीएलच्या जाहिरातींना अनेकदा महाभारताची पार्श्‍वभूमी असते, त्याचाही परिणाम असू शकेल.
असो. कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवाव्यात की खेळवू नयेत, ही चर्चा इतकी जुनी झाली असं वाटतच नाही; कारण कोविड अजून कायम असतानाच पुढच्या हंगामासाठी खेळाडूंचे लिलावही झालेत. यंदाच्या लिलावातला सगळ्यात महागडा खेळाडू कोण ठरला, याच्या उत्सुकतेबरोबरच अनेक गमतीजमतीही यंदाच्या लिलावात पाहायला मिळाल्या. सगळ्यात मोठी धमाल म्हणजे “शाहरूख खानचा लिलाव.’ खरं तर शाहरूख खान हा एका संघाचा मालक आहे. मग त्याचा लिलाव कसा झाला? आणि शाहरूखला नेमकं प्रीती झिंटानेच आपल्या संघासाठी कसं उचललं? मुळात शाहरूख आपल्या संघाचा लिलाव सोडून पॅड बांधून मैदानात कधी उतरला? अशा प्रश्‍नांनी क्रिकेटशौकीनही चकित झाले आणि चित्रपटशौकीनही! पण हा शाहरूख खान वेगळाच निघाला. तो म्हणे चेन्नईचा खेळाडू आहे. बॉलिवूडचा विचार करता त्याचा शाहरूखशीही संबंध नाही आणि प्रीती झिंटाशीही नाही; कारण मातापित्यांनी “शाहरुख’ नाव ठेवलेलं असूनसुद्धा तो स्वतः तलैवाचा म्हणजे रजनीकांतचा फॅन आहे. त्याची “बेस प्राइस’ 20 लाख होती; पण अंतिम बोली 5.25 कोटींची लागली, अशी माहिती मिळालीय. 16.25 कोटी बोली लागलेला ख्रिस मॉरिस हा सर्वांत महागडा ठरल्याच्या चर्चेतली हवाही लवकरच विरली.
सर्वांत महागडा ठरला विराट कोहलीच. त्याला कायम आपल्याकडे ठेवण्यासाठी “आरसीबी’ संघानं म्हणे दर हंगामात 17 कोटींची रक्‍कम फिक्‍स केलीय. यंदाच्या आयपीएलमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याच्याही खेळाविषयी लोकांना उत्सुकता असणार आहे. पण लिलावप्रक्रियेत लक्षवेधी ठरला तो कृष्णप्पा गौतम. एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक म्हणजे 9.25 कोटींची बोली कृष्णप्पासाठी लागली. त्याला एवढे पैसे मिळणार या कल्पनेनं त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यांत उभे राहिलेले आनंदाश्रू सर्वाधिक मोलाचे वाटतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.