पेनिसिलीनचा नवा प्रकार
वाशिंग्टन, ता. 6 – निरनिराळ्या विकारांवर उपयोगी पडणाऱ्या एका नवीन प्रकारच्या पेनिसिलीनची माहिती येथे काल 16 राष्ट्रांतील वैज्ञानिकांपुढे मांडली गेली. अमेरिकन अन्न शेतकी विभागाच्या पुरस्काराने जंतुविरोधी रसायनांचा विचार करण्यासाठी जी तिसरी वार्षिक परिषद भरली आहे, त्या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजात ही चर्चा झाली. “फेनोविसमिथिल पेनिसिलीन’ किंवा “पेनिसिलीन फाइव्ह’ असे नाव त्या नवीन प्रकाराला दिले गेले आहे. अमेरिकन वैज्ञानिकांनी असे सांगितले की, ते नवीन प्रकारचे पेनिसिलीन शरीरात लवकर शोषले जाते. ते शरीरात टोचण्यापेक्षा पेय औषधाच्या रूपात पोटात घेणे अधिक फायदेशीर आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पेंडसेंची निवड
पुणे – पंढरपूर येथे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या 38व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नागपूरचे डॉ. शं. दा. पेंडसे यांची निवड झाल्याचे वृत्त येथे आले आहे. संमेलनाच्या स्वागत मंडळाची सभा पंढरपूर येथे भरली होती.
भारतीय विनोद!
नवी दिल्ली – बाजारात जाहीरपणे खुशाल विकले जाणारे तूप किती “चोख’ असते याचे संशोधन म्हैसूरच्या अन्न संशोधनालयाने केले असून त्यांनी यावर विदारक प्रकाश टाकला आहे. 23 टक्के नमुन्यात तुपाचा काडीइतकाही अंश नव्हता, 25 टक्के नमुन्यात अर्धिअधिक भेसळ केलेली होती नि राहिलेल्या तुपांच्या नमुन्यात तुपाचा किंचित अंश असल्याचा निव्वळ भास होत होता. तूप पाहून वा वासाने परीक्षा होते अशी जी सामान्य जनतेची कल्पना आहे ती चुकीची असल्यामुळेच ही भेसळ सरसकट चालू आहे.
चीनमध्ये माशा नाहीत तशी कुत्रीही नाहीत!
नवी दिल्ली – चीनमध्ये माशा नाहीत त्याचप्रमाणे कुत्रीही दिसत नाहीत अशी माहिती भारतीय प्राध्यापकाचे शिष्टमंडळ घेऊन गेलेले डॉ. सी. पी. रामस्वामी यांनी सांगितल्याचे समजते.
अमेरिकन लोक कुत्र्यांमार्फत चीनमध्ये रोगराईचा प्रसार करीत असत हे उघडकीस आल्यामुळे कुत्रा हा प्राणीच नाहीसा करण्यात आला, असे श्री. रामस्वामी यांना चीनमध्ये सांगण्यात आले असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.