इंदिरा गांधी कॉंग्रेस अध्यक्ष होणार?
अभ्यंकरनगर (नागपूर), ता. 12 – श्री. धेबर यांच्या निवृत्तीनंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणावर टाकावी याचा विचार करण्यासाठी काल रात्री पं. नेहरू, पंत, धेबर, लाल बहादूर शास्त्री प्रभूती श्रेष्ठींची बैठक भरली होती. दोन-तीन नावांचा विचार झाला आणि शेवटी इंदिरा गांधींनाच अध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घालावी असा सूर दिसला. हीच योजना मान्य झाली तर प्रदेश कॉंग्रेस समितीच्या नेत्यातर्फे इंदिराबाईंचे नाव औपचारिकरीत्या सुचविण्यात येईल.
रशियाची तह योजना प. जर्मनीस नापसंत
लंडन – जर्मन तहासंबंधीच्या रशियाच्या नव्या योजनेवर विचार करण्यासाठी प. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हर हेन्रिच व्हॉन ब्रॅटॅनो यांनी काल आपल्या खात्यातील प्रमुखांची बैठक घेतली होती. रशियाची ही योजना स्वीकारणीय नाही असे राजनैतिक गोटांतील वृत्त असून पश्चिमी राष्ट्रांच्या दृष्टिकोनाचा रशियन योजनेत विचारच केलेला नाही, असे ही मंडळी म्हणाली.
सत्ता घेऊन समाजवादी महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी समितीला समर्थ केले पाहिजे
पुणे – संयुक्त महाराष्ट्र समितीची नवी घटना शक्यतो लवकर अंमलात येणे आवश्यक आहे. केवळ संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व करण्याच्याच दृष्टीने नव्हे तर सार्वत्रिक निवडणुका जिंकण्यासाठी, त्यानंतर पडणारी राज्यकारभाराची धुरा वाहण्यासाठी व समाजवादी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी नवीन घटना अंमलात आणण्याची विशेष निकड आहे, असा ठराव मजदूर किसान पक्ष महाराष्ट्र शाखेच्या कार्यकारिणीचे बैठकीत मंजूर करण्यात आला.
मजदूर किसान ठरावांत पुढे म्हटले आहे की, समाजवादी महाराष्ट्राची उभारणी केवळ घोषणांनी होणार नसून त्यासाठी जनतेला जागृत करून शिक्षण दिले पाहिजे.
रामदास स्वामींचे तैलचित्र
पुणे – पुणे विद्यापीठात सोयीस्कर ठिकाणी श्रीसमर्थ रामदास स्वामींचे तैलचित्र लावण्यास कार्यकारी मंडळाने संमिती दिली. स्वामींच्या 350व्या जन्मोत्सवानिमित्त स्थापन झालेल्या उत्सव-समितीने वरील सूचना केली होती. समितीने स्वामींचे तैलचित्र विद्यापीठास देऊ केले आहे.