वंशद्वेष्टांचा शिखर परिषदेने निषेध करावा; डॉ. राधाकृष्णन यांचे भाषण
मुंबई, ता. 26 – आगामी शिखर परिषदेने काहीही अनुमान न करता वांशिक पक्षपात, वांशिक सत्ता व कत्तल यांचा कडाडून निषेध केला पाहिजे, असे उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी आज येथे इंटरनॅशनल फोरमचे बैठकीतील खान्याचे प्रसंगी भाषण करताना सांगितले. डॉ. राधाकृष्णन म्हणाले, शांतता प्रस्थापनेसाठी जरूर त्या गोष्टी केल्या नाहीत व दुसरेच प्रकार होत राहिले तर मृगजळाचा पाठलाग केल्यासारखेच होईल. केवळ जनतेस निःशस्त्र व्हा, अण्वस्त्रे टाका असा उपदेश करण्यात अर्थ नाही. आंतरराष्ट्रीय शांतता हवी असेल तर ती आंतरराष्ट्रीय न्यायावर व सर्व परतंत्र राष्ट्राचे स्वातंत्र्यावर आधारलेली, वांशिक श्रेष्ठत्वाचा परिहार करणारी आणि राष्ट्राराष्ट्रांतील आर्थिक विषमता-सामाजिक असमानता नष्ट करणारी असली पाहिजे.
मोटारीवर एकमुखी कर बसवण्यास मान्यता
नवी दिल्ली – देशातील वाहतूक विकास मंडळाच्या बैठकीत वाहतूक मंत्री राजाबहादूर यांनी असे जाहीर केले की, सर्व राज्य सरकारांनी मोटारीवर “एक मुखी’ कर बसविण्याचे तत्त्व मान्य केले आहे.
स्वतंत्र विदर्भासाठी चळवळ चालूच राहणार
नागपूर – नागविदर्भ आंदोलन समितीच्या कृति समितीचे नवे अध्यक्ष श्री. मुखरे यांनी असे जाहीर केले की, स्वतंत्र विदर्भासाठी सुरू करण्यात आलेली जंगल सत्याग्रहाची चळवळ 30 एप्रिलपर्यंत अप्रहितपणे चालू राहील. सत्याग्रहाची रूपरेषा वेळोवेळी जाहीर केली जाईल.
दगडी कोळशाच्या अभावी गिरण्या बंद पडणार
सोलापूर – येथील पाचही कापड गिरण्यांतून दगडी कोळशाचा साठा अपुरा आहे. 3-4 दिवसांत जर दगडी कोळसा आला नाही तर कदाचित गिरण्या बंद ठेवण्याचा प्रसंग उद्भवेल.