48 वर्षांपूर्वी प्रभात : उद्योगधंद्यांविषयी दुस्वास बाळगणे चुकीचे!

ता. 23, माहे जुलै, सन 1973

सचोटीने वागण्याची श्रद्धा जिवंत ठेवणे अत्यावश्‍यक

पुणे, ता. 22 – सध्या देशात सचोटीने वागण्याची लोकांची निष्ठा जिवंत ठेवणे अत्यावश्‍यक आहे. असत्यनारायणाची पूजा करण्याकडे सध्या प्रवृत्ती वाढत आहे, तिला आळा घातला पाहिजे व सत्याचा विजय होतो हे दाखवून दिले पाहिजे’, असे उद्‌गार एस. एम. जोशी यांनी काढले. ते म्हणाले, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाले, परंतु त्याचे हेतू साध्य होण्यासाठी इन्फ्रा स्ट्रक्‍चर तयार होणे आवश्‍यक आहे. लोकांना दिलेले कर्ज परत फेडले जाण्यासाठी लक्षपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सचोटीची प्रवृत्ती कशी वाढेल इकडे लक्ष दिले पाहिजे.

उद्योगधंद्यांविषयी दुस्वास बाळगणे चुकीचे!

पुणे- बॅंका मोठ्या उद्योगधंद्यांना कर्ज देतात म्हणून त्या उद्योगधंद्यांविषयी दुस्वास बाळगणे ही असामाजिक वृत्ती होय अशी टीका आबासाहेब गरवारे यांनी आज येथे केली.

नव्या अफगाण सरकारला अमेरिकेची मान्यता

नवी दिल्ली – अफगाणिस्तानमधील नव्या राजवटीला अमेरिकन व ब्रिटन सरकारांनी मान्यता दिली आहे. सरदार महम्मद दाउद खान यांच्या नेतृत्वाखाली ही नवी राजवट आहे. अफगाणिस्तानच्या नव्या राजवटीचा “इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’ (अफगाणिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक) असा उल्लेख पाकिस्तान नभोवाणीवरून करण्यात आला.

दुष्काळी कामावरील मजुरी अद्याप नाही

पुणे – शिरूर तालुक्‍यातील 89 दुष्काळी कामांच्या मस्टरवरील 22 लाख रुपये मजुरी शासनाने अद्याप न दिल्याने या गंभीर अन्यायाबद्दल बाबुराव दौंडकर व शिरूर तालुका दुष्काळ निवारण समितीचे बिंदुमाधव जोशी बेमुदत उपोषणास बसणार आहेत. आज याबाबत शिरूर तहसीलदार कार्यालयावर दुष्काळी स्त्रीपुरुषांचा मोर्चा काढण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.