कृत्रिम पावसासाठी नव्या तंत्राचा शोध
पुणे, ता. 5 – कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आपण साधे व कमी खर्चाचे तंत्र शोधले आहे असा दावा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. या तंत्रामध्ये विमानाची गरज नसते. या तंत्राचा वापर करून महाराष्ट्रातील निरनिराळ्या चार जिल्ह्यांमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यात यश आले आहे. या प्रयोगासाठी केवळ 500 रुपये खर्च येतो. या प्रयोगाने वारणा या सांगली जिल्ह्यामधील गावी आठ किमी त्रिज्येच्या क्षेत्रात 15 मिमि
पाऊस पडला.
पाऊस आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पेढे वाटले
मुंबई – सतत तीन वर्षे दुष्काळाने ग्रासलेल्या महाराष्ट्रात आता सर्वत्र पाऊस पडत आहे. याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आज मुख्यमंत्री नाईक यांनी पत्रकार परिषदेचे वेळी पेढे वाटले.
पंढरपूर यात्रेकरूंसाठी- कॉलरा लस टोचून घ्या
पुणे- आषाढी यात्रेकरिता पंढरपूरला जाणाऱ्या यात्रेकरूंनी पंढरपुरात प्रवेश करण्यापूर्वी कॉलरा प्रतिबंधक लस टोचून घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. लस टोचण्याची व्यवस्था पुणे (स्वारगेट), जुन्नर, नारायणगाव, घोडेगाव, तळेगाव दाभाडे, शिरूर इत्यादी तेरा एसटी स्थानकांवर केली आहे. दि. 11 पूर्वी लस टोचून घेतल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
पाकिस्तानी कैद्यांच्या बायकामुलांची मुक्तता
नवी दिल्ली – पाकिस्तानी युद्धकैद्यांच्या व नागरी कैद्यांच्या दोनशे बायका मुलांना मुक्त करण्याचा निर्णय भारत व बांगला देश यांनी संयुक्तपणे घेतला आहे. या 200 लोकांना 20 जुलै रोजी वाघा येथील नाक्यावर सोडण्यात येईल.