करचुकवेगिरी, कोर्टाकडून “स्टे’ मिळणार नाही
पुणे, दि. 25 – आर्थिक गुन्हे करणाऱ्यांना कायद्याचा आधार घेऊन त्यांचे विरूद्धची कारवाई स्थगित करता येऊ नये म्हणून घटनादुरुस्ती करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. केंद्रीय अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी लोकसभेत हे सूचित केले. ते प्राप्तिकर कायद्याखाली दुरुस्ती बिलावरील चर्चेस उत्तर देत होते. प्राप्तिकराची मर्यादा आता 6000 वरून 8000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्राप्तिकर अधिकारी जेव्हा कर चुकविणाऱ्यांवर फिर्याद करतात तेव्हा ते कोर्टाकडून “स्टे’ मागतात. “स्टे’ उठवण्याची वेळ येईपर्यंत हे करचुकवे पुरावा नष्ट करतात. म्हणून “स्टे’ ऑर्डर मिळणार नाही.
आयरिश क्रांतिकारकांची मुक्तता होणार
लंडन – उत्तर आयर्लंडमध्ये आयरिश क्रांतिकारकांना खटले न भरता स्थानबद्ध करून देण्यात येते. ती प्रथा आता ब्रिटिश सरकार बंद करणार असून तेथे स्थानबद्ध असलेले 116 क्रांतिकारकांना येत्या नाताळपर्यंत बंधमुक्त करण्यात येणार आहे.
अमेरिकेचे अपोलोवीर पृथ्वीवर सुखरूप परतले
न्यू ऑलिअन्स, बोटीवरून – अमेरिकेचे तीन अंतराळवीर अपोलो यानातून पृथ्वीवर सुखरूपपणे परत आले. या अपोलोच्या परतीनंतर अमेरिकन सरकारचा अंतराळ संशोधन प्रयोग तूर्त थांबविण्यात आला. अपोलोचे वीर हवाईबेटाच्या पर्ल हार्बरच्या पश्चिमेस 320 किमी अंतरावर उतरले.