प्रतिनिधींना परत बोलाविण्याचा हक्क हवा
नवी दिल्ली, दि. 19 – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के. सी. हालदार लोकसभेतील चर्चेत भाग घेताना म्हटले की, “सध्याच्या परिस्थितीत घटनेत बदल होण्याची जरुरी आहे. कायदेमंडळाला अधिक अधिकार असावेत. मतदानासाठी किमान वयोमर्यादा 18 असावी. लोकांना त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी परत बोलविण्याचा हक्क दिला जावा. असा हक्क दिला तर ध्येयवादाविना होणाऱ्या पक्षबदलास आळा बसू शकेल. तसेच प्रत्येकाला काम करण्याचा हक्क असावा व याचा मूलभूत हक्कात समावेश केला जावा.
लोकसभेच्या अधिवेशनाची मुदत वाढविली
नवी दिल्ली – लोकसभेच्या चालू अधिवेशनाची मुदत 8 दिवसांनी वाढविण्यात आली आहे. परंतु 16 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत कामकाज 10 दिवस बंद राहील. प्रथम असे ठरले होते की, 14 मे रोजी अधिवेशन संपावे. परंतु आता ते 22 मे रोजी संपेल. लोकसभेत संसदीय कामकाज खात्याचे मंत्री रघुरामय्यांनी हा निर्णय जाहीर केला.
अरुणाचल प्रदेशात तेल सापडले
गौहत्ती – अरुणाचल प्रदेशातील तिराप जिल्ह्यात खुर्संग येथे 3100 फूट खोलीवर तेल सापडले आहे, असे “ऑइल इंडिया’चे कार्यकारी संचालक दासगुप्ता यांनी सांगितले.