चीनशी संबंध सुरळीत करण्याची रशियाची इच्छा
मॉस्को, दि. 2 – चीनशी संबंध सुरळीत करण्याची आपली इच्छा असल्याचे रशियातर्फे आज जाहीर करण्यात आले. चीनच्या 27व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रेमलिनमधून पाठविण्यात आलेल्या अभिनंदनपर संदेशात चीनला कळविले आहे.
हिंदी महासागरात रशिया लष्करी तळ उभारणार नाही
नवी दिल्ली – निःशस्त्रीकरण प्रश्नासंबंधी रशियाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदी महासागरात रशियाचा लष्करी तळ नाही व असा लष्करी तळ उभारण्याची रशियाची इच्छाही नाही. रशिया हिंदी महासागरातील परकीय देशांच्या लष्करी हालचाली कमी करण्याची मागणी करील, असेही म्हटले आहे.
मंगळावर जीवसृष्टीची शक्यता नाही?
पासाडेना, कॅलिफोर्निया – व्हायकिंग-2 या यानाने नुकत्याच पाठविलेल्या माहितीत मंगळावर सेंद्रीय पदार्थ सापडले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंगळावर जीवसृष्टी सापडण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. माणसाला माहीत असलेली जीवसृष्टी कार्बनच्या सुक्ष्म कणांशिवाय अस्तित्वात असणे शक्य नाही.
व्हायकिंग-2 यानाने मातीची पहिली परीक्षा केली. तिची माहिती येथे आली आहे. मातीचा नमुना 200 डिग्री फॅरनहॅटपर्यंत तापविण्यात आला. मातीत सेंद्रीय पदार्थ असल्यास त्याची वाफ व्हावी हा या मागचा उद्देश होता. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार व्हायकिंग-2 यान सेंद्रीय पदार्थासाठी आणखी शोध करील.