विज्ञानविश्‍व : रोबोट्‌स आणणार पार्सल

-डॉ. मेघश्री दळवी

मागच्या दशकात कारखान्यांपर्यंत मर्यादित असलेले रोबोट्‌स या दशकात आपल्या दैनंदिन आयुष्यात हळूहळू शिरकाव करत आहेत. रोबोट वेटर्स असलेली रेस्टोरंट्‌स चीन, जपान, सिंगापूरमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. बॅंक, विमानतळ किंवा काही ऑफिसमध्ये ग्राहकांना मदत करायला रोबोट्‌स दिसायला लागले आहेत. त्यात आता भर पडणार आहे पार्सल आणणाऱ्या रोबोटची!

फोर्ड या वाहनं बनवणाऱ्या कंपनीची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. आपण एखाद्या दुकानातून किंवा ऑनलाइन खरेदी केली तर ती घरी आणून पोचवण्याचा एक पर्याय असतो. आपल्याला हा पर्याय अर्थात सोपा पडतो. मात्र विक्रेत्यांना त्यासाठी बरंच काम पडतं. खरेदी केलेल्या वस्तू दुकानातून किंवा गोदामातून उचलणे, आपली आणि त्यांची वेळ योग्य प्रकारे जुळवून घेणे, मग एका माणसाने वाहन चालवत आपल्या घरापर्यंत आणणे आणि आपल्या दाराशी येऊन पार्सल आपल्या हाती देणे. या पूर्ण प्रक्रियेत शक्‍य तितकं स्वयंचलन (ऑटोमेशन) आणून कार्यक्षमता वाढवणे आणि खर्च कमीतकमी करणे ही विक्रेत्यांची उद्दिष्ट असतात. यातला नियोजनाचा बहुतांशी भाग आतापर्यंत सॉफ्टवेअर प्रणालींकडे सोपवला गेला आहे. गोदामातून माल वाहनापर्यंत आणणे हेही रोबोट्‌स करू शकतात. त्यामुळे माणसांसाठी काम उरले आहे ते वाहन चालवून आपल्यापर्यंत सामान आणणे आणि ते दाराशी येऊन आपल्या हवाली करणे.

फोर्ड कंपनीला नेमकं हेच काम आता स्वयंचलित करायचे आहे, माणसांशिवाय पार पाडायचे आहे. स्वचालित (सेल्फ-ड्रायव्हिंग) गाडीसाठी फोर्ड संशोधन करतेच आहे. इतर अनेक कंपन्याही अशा गाड्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे येत्या दोन-चार वर्षांमध्ये एखादे स्वचालित वाहन आपले पार्सल आपल्या घरापर्यंत घेऊन येऊ शकते. राहिले ते पार्सल आपल्या दारापर्यंत आणणे, ज्याला लास्ट माइल म्हणजे शेवटचे काम अशी संज्ञा आहे आणि ते करणार आहे रोबोट्‌स.

बरीच कामे माणसाशिवाय करण्याचा ध्यास आपल्याला कधी कधी समजत नाही. पण अनेक प्रगत देशांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा आहे. जर्मनी, जपान यांसारख्या देशांमध्ये जन्मदर अत्यंत कमी आहे, तर ग्रीस, हंगेरी, इटली या देशांची लोकसंख्या वाढत नसून घटत चालली आहे. त्यामुळे उपलब्ध माणसे कमी तर पडतातच, शिवाय सुखकर जीवनशैली आणि कायदेशीर बंधन असल्याने ठराविक तासांपलिकडे माणसे कामासाठी मिळू शकत नाही. म्हणून हा सारा रोबोट्‌स आणि स्वयंचलनाचा खटाटोप. फोर्ड कंपनीने नुकतीच डिजिट या रोबोटची या कामासाठी चाचणी घेतली.

डिजिट ह्यूमनॉइड आहे, म्हणजे माणसासारखा दिसतो. त्याला दोन हात, दोन पाय आणि माणसाइतकी उंची आहे. स्वचालित गाडीतून उतरून वाटेतले अडथळे टाळून डिजिट एका घरापाशी पार्सल घेऊन पोचतो आहे असा व्हिडिओ फोर्डने प्रसारित केला आहे. डिजिट बनवण्यासाठी फोर्डने ऍजिलिटी रोबोटिक्‍स या कंपनीची मदत घेतली आहे. येत्या काही वर्षांत स्वचालित गाडी आणि पार्सल आणून देणारा लास्ट माइल रोबोट ही जोडगोळी जागोजागी दिसेल. ते किराणा माल, फर्निचर, अशा वस्तू आणून देतील अशी आशा फोर्ड आणि ऍजिलिटी रोबोटिक्‍स यांनी व्यक्‍त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.