-ह.भ.प. नारायण म. डमाळे शास्त्री
नित्यसत्यमित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ।।
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ।।
श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील चौदाव्या अभंगात हरि नामाचे महत्त्व सांगत आहेत, माऊली म्हणतात, हरिचा नित्य, सत्य व अपरिमित जप करणाऱ्याकडे कळीकाळ दृष्टीने देखील पाहत नाही. वाचेने निरंतर रामकृष्ण नामाचा जप करण्याने तपाच्या अनंतराशी घडतात व त्या योगाने पापाचे समुदायांचे समुदाय पुढे पळून जातात.
हरि हरि हरि हा शिवाचा नित्य जप करण्याचा मंत्र आहे. या मंत्राचे जे कोणी वाचेने ग्रहण करतील त्यांस मोक्षाची प्राप्ती होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी निरंतर नारायण नामाची आवृत्ती करतो. त्या योगाने देहत्रयातील अतिउत्तम आत्मस्वरूपस्थानाची मला प्राप्ती झाली आहे.