साराबंदी आंदोलन
बेळगाव, ता. 10 – बेळगाव खानापूरच्या खेड्यातील शेतकऱ्यांनी म्हैसूर सरकारला सारा देणे बंद करावे अशी हाक महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आमदार बा. रं. सुंठणकर यांनी दिली आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आदेशावाचून सारा देऊ नये असे त्यांनी सांगितले आहे. शिनोळी खेड्यात भरलेल्या मेळ्यात सुंठणकर बोलत होते. ते म्हणाले, सीमा प्रश्न निकराचा झाला असून आता सत्याग्रह चळवळीस पूरक म्हणून साराबंदी आंदोलन उभारले पाहिजे. या मेळाव्यास 30 खेड्यांतील लोक हजर होते.
नव्या कॉंग्रेसी पक्षाचे कम्युनिस्टांकडून स्वागत
हैदराबाद – आंध्र कॉंग्रेसमधून फुटून निघालेल्या लोकांनी नवा पक्ष बनविण्याची जी घोषणा केली त्याचे आंध्र कम्युनिस्टांनी स्वागत केले आहे. फुटीर कॉंग्रेसवाल्यांचा नवा पक्ष डावा म्हणूनच पुढे येईल अशी अपेक्षा कम्युनिस्टांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
पुरीचे जगन्नाथ मंदिर सर्व धर्मीयांना खुले
पुरी – येथील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर सर्व धर्मीयांना खुले केले आहे. दर्शनार्थी हिंदू असोत, बिगरहिंदू असोत, अभारतीय असोत, त्यांना प्रवेश मिळेल, असे पुरीचे महाराज गणपती वीर किशोरदेव यांनी जाहीर केले आहे. यापूर्वी फक्त जन्मजात हिंदूंनाच या मंदिरात प्रवेश असे. हे मंदिर 12व्या शतकात बांधले आहे.
बालकांच्या तीन दुर्धर रोगांवर विजय
लंडन – या वर्षी ब्रिटनच्या शालेय आरोग्य योजनेस 50 वर्षे पुरी होतात. त्या निमित्ताने या योजनेच्या कार्याचा अहवाल प्रसिद्ध केला. गेल्या दशकात क्षय, रिकेटस व संधिवात या तीन रोगांनी बालकांना फार पछाडले होते, आता या रोगांचे संपूर्ण उच्चाटन केले असल्याचे या अहवालावरून दिसून येते. पोलिओ किंवा बाल पक्षाघात हा आजच्या काळातील अति भयंकर रोगसुद्धा लवकरच इतिहासजमा होईल.