– ह.भ.प. नारायण डमाळे
देखे मनुष्यजात सकळ। हे स्वभावता भजनशील। जाहले असे केवळ। माझ्या ठायी ।।
प्रत्येक माणूस स्वभावत: भजनशील आहे. मनुष्याने कशाचीही भक्ती केली तरी तो भगवंताचीच भक्ती करत असतो. आपल्या वाट्याला आलेले कर्म कौशल्याने केले तरी ती भक्तीच आहे. परंतु भगवंताचे वास्तव स्वरूप माहिती नसल्याने ती व्यापकाची भक्ती घडत नाही. व्यापकाचे ज्ञान नसल्यामुळे देवा-देवांमध्ये भेद निर्माण झाले आहेत.
म्हणोनि अभेदा भेद देखती। यया अनामया नाम ठेविती। देवी देवो म्हणती। अचर्चाते।।
व्यापक परमात्म्यालाच गणपती, मारुती, राम, शंकर, विठ्ठल अशी वेगवेगळी नावे दिलेली आहेत. त्याला रूप नाही पण वेगवेगळी रूपे दिलेली आहेत. मुळात तो व्यापक आहे.
जे सर्वत्र सदा सम। तेथ विभाग अधोत्तम। मतीवशे संभ्रम। विवंचीती।। ज्ञानेश्वरी