नोंद : बदलांना सामोरे जा!

-देवयानी देशपांडे

कुटुंबसंस्था, लग्नसंस्था, शिक्षणसंस्था या सामाजिक संस्थांच्या केंद्रस्थानी माणूस आहे आणि कोविड महामारी हे या अर्थाने माणुसकी पुढील आणि माणसाच्या विचारांना आव्हान निर्माण करणारे संकट आहे.

कोविड महामारीने केले तसे बदल यापूर्वीही जगाने अनुभवले आहेत. मग ती फ्रेंच राज्यक्रांती असो, औद्योगिक क्रांती किंवा आर्थिक महामंदीचा टप्पा असो. जगभरात माणसाच्या जगण्यामध्ये मूलभूत बदल करणारे टप्पे माणसाने यापूर्वीही अनुभवले आहेत. या सर्व टप्प्यांबाबत काही बाबी प्रामुख्याने लक्षात घ्याव्यात अशा आहेत. ऐतिहासिक आढावा घेतला असता परिस्थितीला सामोरे जाण्याची पद्धत प्रथापित करताना माणसाचे वर्तन कसे होते? हा या संदर्भात पडणारा मूलभूत प्रश्‍न आहे. कोणत्याही स्थित्यंतरच्या टप्प्यामध्ये विचारांना आव्हान देणारी परिस्थिती निर्माण झाली, नवी मूल्ये रुजवली गेली. माणुसकीने अनुभवलेले हे महत्त्वपूर्ण टप्पे येणाऱ्या काळाबाबत अंदाज बांधण्यासाठी आवश्‍यक ठरतात. स्थित्यंतराच्या माध्यमातून नवी मूल्ये किंवा नवी पद्धत रुजवताना माणसाने प्रतिप्रश्‍न विचारले असतील का? मी अमुक एखादे यंत्र वापरतो आहे, अमुक मूल्यांना त्याचा पाठिंबा आहे, तो का? असे प्रश्‍न सहजी मनात आले असतील का?

स्थित्यंतराच्या टप्प्याचे साक्षीदार असलेल्या माणसांनी परिस्थितीची समीक्षा न करता आहे तसा बदल स्वीकारला असेल, तर आज या टप्प्यांचे नकारात्मक दुष्परिणाम हे त्याचेच फलित आहे का? कोविड हा आपला वर्तमान आहे आणि म्हणूनच परिस्थितीबाबत उत्तरे न शोधता हा काळ विस्मृतीत गेला तर ते शहाणपणाचे लक्षण मानता येणार नाही. वैचारिक पातळीवर अनेक उत्तरे आपली आपल्याला शोधावी लागतील. नवी पद्धत जाणीवपूर्वक प्रस्थापित करावी लागेल.

याखेरीज, वर नमूद केलेले जागतिक पातळीवरील बदलाचे टप्पे म्हणजे विशिष्ट परिस्थितीला दिलेला प्रतिसाद होता. कोविडला आपण कसा प्रतिसाद देतो हे पाहणे म्हणूनच आवश्‍यक आहे. कोविडच्या टप्प्यामध्येदेखील माणसाला अनेक प्रश्‍न पडणे अपेक्षित आहे. त्या प्रश्‍नांची उत्तरे आपण आपल्या जगण्याचा भाग करून घेतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे. मानवी समाजामध्ये बदल घडवून आणणारे असे उल्लेखनीय टप्पे सरतेशेवटी मानवी समाजावर परिणाम करणारे टप्पे आहेत.

कोविडच्या काळात आपल्या मूलभूत गरजांच्या संकल्पनेबाबत स्पष्टता आली. रोजच्या जगण्यासाठी आवश्‍यक वस्तू उपलब्ध असणे जगण्यासाठी पुरेसे आहे. तसेच, या वस्तूंचा अनावश्‍यक साठा करून ठेवणे गरजेचे नाही असे मूलभूत विचार रुजवले गेले. लग्नसोहोळ्याचा भडकपणा जाऊन त्याला साधे घरगुती स्वरूप आले. लग्न किंवा तत्सम सोहोळ्यांवर होणारी अतिरेकी उधळपट्टी थांबली आणि केवळ घरगुती सोहोळ्याला महत्त्व आले. मानव निसर्गाच्या जवळ आला. या काळात प्रदूषण कमी झाले, असेही काही संशोधन अहवालांतून पुढे आले आहे. हे आणि असे अनेक पाठ ज्या कोविडने आपल्याला दिले ते विसरून चालणार नाही. प्रत्येक आव्हानात्मक टप्प्यामध्ये माणसाने परिस्थितीशी जुळवून घेतले का? जुळवून घेतले असेल किंवा नसेल तर तिथून पुढचा माणसाचा प्रवास कसा राहिला आहे याचा संक्षिप्त आढावा घेणे प्राप्त आहे. जेणेकरून, कोविडोत्तर कालखंडामध्ये मनुष्याचे वर्तन कसे असेल याबाबत काही अंदाज बांधता येईल का, ते ध्यानात येईल.

सर्वप्रथम, आमूलाग्र बदलाच्या प्रत्येक टप्प्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात हे गृहीतक ध्यानात ठेवूयात. कोविड19च्या टप्प्याकडे पाहताना देखील सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करावा लागतो. प्रामुख्याने अर्थशास्त्रीय बाजूचा विचार करता कोविड महामारीचे नकारात्मक परिणाम झाले, असा अनेकांचा दावा आहे. या काळात बेरोजगारी, आर्थिक विवंचना, आत्महत्या, घरगुती हिंसा, घटस्फोटांच्या प्रमाणात वाढ झाली ही माहिती देखील प्रकाशात आली. मात्र, असे असले तरी समाजशास्त्रज्ञ एमिल दरखीम यांनी नमूद केल्याप्रमाणे, समाजाचे स्वरूप अद्वितीय आणि स्वयंप्रेरणेने बदल घडवणारे आहे. अशावेळी माणूस बदलांशी कसे जुळवून घेतो, त्यातून उत्तम ते कसे वेचतो ही बाब अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

कोविड कालखंडाने आपल्याला नवी मूल्यरचनाच दिली. आपल्या जाणीवा समृद्ध केल्या. विपरीत परिस्थितीचे आकलन कसे करावे याबद्दलचे पायंडे देखील रचले. या अभूतपूर्व कालखंडाचे साक्षीदार म्हणून खरेतर, आपण सुदैवी आहोत असेच म्हटले पाहिजे. साहजिकच कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती नवी आहे. या नव्या परिस्थितीला सामोरे जाण्याची कोणतीही प्रस्थापित पद्धत नाही. नवी पद्धत आपण निर्माण करू पाहतो आहोत.

प्रतिसादाची अशी नवी पद्धत निर्माण करताना माणसाचा खरा कस लागतो. माणसाची तर्कबुद्धी, विचारप्रक्रिया यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या या परिस्थितीला जाणीवपूर्वकच सामोरे गेले पाहिजे. आयुष्याला कलाटणी देणारे अनेक टप्पे आपण अनुभवले असले तरी तो टप्पा ओसरल्यानंतर आपण आपल्या आयुष्याची कल्पना कशी करतो हा प्रश्‍न चिंतनाची दालने खुली करणारा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.