अग्रलेख : भाजपची खंत!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये बोलताना विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेशी युती करायलाच नको होती, अशी खंत व्यक्‍त केली आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेबरोबर युती केली नसती, तर भाजपाला स्वबळावर 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, असा विश्‍वासही या रॅलीमध्ये फडणवीस यांनी व्यक्‍त केला आहे. अर्थात, सध्या भाजपाला महाराष्ट्रात विरोधी बाकांवर बसावे लागत असल्याने आणि शिवसेना सत्ताधारी बाकांवर असल्याने भाजपाची खंत त्याच दृष्टिकोनातून बघावी लागणार आहे. 

मुळात जी गोष्ट वर्षभरानंतर समजते ती गोष्ट युती करतानाच भाजपाच्या नेत्यांना समजली नव्हती काय, हाच प्रश्‍न निर्माण होतो. गेल्या वर्षभरापूर्वीची परिस्थिती पाहिली, तर तेव्हा भाजपाला शिवसेनेबरोबर युती हवी होती. या निवडणुकीपूर्वीची पाच वर्षे भाजप आणि शिवसेना यांचे सरकार राज्यात असूनही शिवसेना कधीही भाजपसोबत नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर किंवा एकूणच भाजपा सरकारच्या कारभारावर टीका करण्याची एकही संधी तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोडत नव्हते. त्यामुळेच जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार की नाही, याविषयी शंका निर्माण झाल्या होत्या. पण अखेर भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी चर्चा झाली, त्या चर्चेच्या तपशिलामुळेच निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला, हेही नाकारता येत नाही. 

भाजपने आपल्याला सत्तेत अर्धा वाटा देण्याचे मान्य केले होते आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद अर्धे वाटण्यात येणार होते, असा दावा उद्धव ठाकरे प्रथमपासूनच करत होते. पण निवडणुकीनंतर भाजपने तशा प्रकारची कोणतीही तयारी न दाखवल्याने राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता आणि अखेर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे सरकार स्थापन झाले. या नव्या आघाडीच्या सरकारच्या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी युती करायलाच नको होती, अशा प्रकारची खंत व्यक्‍त केली आहे, हे समजून घ्यायला हवे. मुळात गेल्या दहा ते पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये भाजपाने कायमच शतप्रतिशत भाजप असा नारा दिला आहे. देशात शक्‍यतो कोणाशीही युती न करता स्वबळावर सत्ता मिळावी, हाच भाजपाचा एककलमी अजेंडा आहे. त्याच भूमिकेतून भाजपाने आपल्या मित्रपक्षांशी कसे वागायचे, याबाबत भूमिका तयार केली आहे. 

भाजप आणि शिवसेना यांची महाराष्ट्रामध्ये 25 वर्षांपेक्षा जास्त काळ युती असली तरी या युतीमध्ये शिवसेनेला नेहमीच दुय्यम भूमिका राहिली होती, याची खंत उद्धव ठाकरे यांनी नेहमीच व्यक्‍त केली होती. गेली पंचवीस वर्षे शिवसेना युतीमध्ये सडली, अशा प्रकारचे टोकाचे विधानही त्यांनी केले होते. हे सर्व जरी काही खरे असले तरी भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर दीडशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, हे फडणवीस यांचे विधान योग्य आहे का, याचा विचार करावा लागणार आहे. त्यापूर्वीची विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढवली होती. 121 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला होता, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष होता. पण गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती झाली होती. अशा परिस्थितीत भाजप आणि शिवसेना जर स्वबळावर लढले असते तर त्यांची परिस्थिती आता आहे, त्यापेक्षा खराब झाली असती असेच राजकीय चित्र आहे. 

अर्थात, भाजप-शिवसेना यांनी स्वबळावर निवडणूक लढविली असती तर सर्व 288 जागा त्यांनी लढवल्या असत्या आणि त्या प्रमाणात यशही मिळाले असते, याची खंत आता फडणवीस यांना वाटत असावी. अर्थात, केवळ शिवसेनाच नव्हे तर भाजपच्या बरोबर कायम असणारे रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांच्या पक्षांनाही भाजपाने दुय्यम स्थान दिले होते, हे येथे नाकारता येत नाही. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये जर सत्ता मिळवायची असेल तर युतीचे आणि आघाडीचे राजकारण करण्याशिवाय पर्याय नाही, हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे. सध्या राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे वेगळेच समीकरण निर्माण झाले आहे, हे त्याचे ताजे उदाहरण मानावे लागेल. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केलेली खंत मनापासूनची भावना आहे की, केवळ शिवसेनेला राजकीयदृष्ट्या दुखावण्यासाठी केलेले विधान आहे, हेही तपासून पाहावे लागेल. भाजप आपल्या मित्रपक्षांशी ज्याप्रमाणे वागतो त्यामुळे मित्रपक्ष दुखावतात आणि भाजपपासून दूर होतात, असेच आतापर्यंत दिसून आले आहे. 

सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भाजपाचा एक मित्रपक्ष असणाऱ्या लोकजनशक्‍ती पार्टीचे नेते चिराग पासवान ज्याप्रकारे भाजपवर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका करत आहेत ते पाहता भाजपला आपल्या मित्रपक्षांना सांभाळता येत नाही की काय, असाही प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे निवडणुकीनंतर स्वबळावर निवडणूक लढवायला हवी होती, अशी खंत व्यक्‍त करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वीच आपल्या मित्रपक्षांना जर व्यवस्थित सांभाळले तर निवडणुकीत जास्त चांगले यश मिळू शकते, हे भाजपने समजून घेण्याची गरज आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये भाजपच्या बाजूने 20 पेक्षा जास्त सहकारी मित्रपक्ष होते. आज ही संख्या खूपच कमी झाली आहे. भाजपाच्या शतप्रतिशत भाजप धोरणाचा तो भाग आहे असे गृहित धरणे म्हणजे भाजपचे मित्रपक्षांबाबतचे धोरण चुकत आहे, हे मान्य करण्यासारखे आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जे काही ठरले होते, ते भाजपने मान्य केले असते तर आज वर्षभरानंतर अशा प्रकारची खंत व्यक्‍त करण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली नसती, हेसुद्धा या ठिकाणी समजून घ्यायला हवे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.