विज्ञानविश्‍व : धूमकेतूंच्या मागावर

-डॉ. मेघश्री दळवी

धूमकेतूंचे माणसाला खूप पूर्वीपासून आकर्षण आहे. त्यांची ती लांब शेपटी, अचानक होणारं आगमन, सूर्याच्या दिशेने झेप आणि मग परत कित्येक वर्षे तोंड न दाखवण्याची तऱ्हा. सोबत हरप्रकारच्या समजुती-गैरसमजुती आणि अंधश्रद्धा. पुढे खगोलशास्त्राच्या दृष्टीने धूमकेतूंचा सखोल अभ्यास झाला, त्यांचं आगमन गणित करून निश्‍चित करता येऊ लागलं, त्यांची अधिकाधिक माहिती मिळू लागली, तसं हे आकर्षण वैज्ञानिक कुतुहलामध्ये बदललं.

अलीकडे धूमकेतूंच्या अभ्यासाला पुन्हा महत्त्व येऊ लागले आहे. पृथ्वीवर पाणी कुठून आले, त्याचे मूळ अवकाशात कुठे असावे याचा मागोवा घेता घेता शास्त्रज्ञांना त्यामागे धूमकेतू असावे असे वाटत आहे. पृथ्वीची निर्मिती ज्या प्रकारे झाली आहे, त्यात पाणी येणे कधीच शक्‍य नव्हतं. मात्र धूमकेतूंचे केंद्र बहुतेक वेळा बर्फाळ असतं. एखाद्या धूमकेतूने पृथ्वीला पाणी बहाल केले असेल का, या दिशेने संशोधन सुरू आहे.

पॅरिस वेधशाळा आणि पॅरिस विद्यापीठाने संयुक्‍तपणे हाती घेतलेल्या या संशोधनात हायपरऍक्‍टिव प्रकारच्या धूमकेतूंमधील बाष्प आणि पृथ्वीवरच्या महासागरातले पाणी यात कमालीचं साम्य आढळलं आहे. हे हायपरऍक्‍टिव धूमकेतू सूर्याच्या जवळ जातात तेव्हा त्यांच्यामधल्या बर्फाची वाफ होऊन जाते आणि हे बाष्पकण त्यांच्याभोवतीच्या वातावरणात पसरतात. त्यात जोडीने बर्फाचे अतिसूक्ष्म कणदेखील असतात. धूमकेतूंच्या अशा भल्या मोठ्या शेपटातूनच ते बाष्पकण पृथ्वीच्या वातावरणात आले असावेत असा या चमूचा प्राथमिक अंदाज आहे.

डिसेंबर 2018 मध्ये 46पी/विर्टानेन हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून गेला. तेव्हा या संशोधकांच्या गटाने त्याचा अभ्यास केला. त्यातल्या बाष्पकणांमध्ये जड पाण्याचे जे प्रमाण आढळले, ते जवळजवळ पृथ्वीवरच्या पाण्यातल्या प्रमाणाइतके आहे. या आधीही दोन अशा हायपरऍक्‍टिव प्रकारच्या धूमकेतूंमध्ये हेच प्रमाण आढळले होते, त्यामुळे या सिद्धांताला पुष्टी मिळते आहे. तसं असेल तर धूमकेतूंनी पृथ्वीला जीवन दिलं आहे म्हणायला निश्‍चितच जागा आहे.

धूमकेतूंमधल्या या बाष्पाचा वापर करून अवकाशात ऑक्‍सिजन निर्माण करता येईल का, या विचारांना आता चालना मिळत आहे. अवकाशभ्रमंती करायची असेल तर ऑक्‍सिजनचा अभाव असल्याने मर्यादा येते. अधिक काळ अवकाशात राहणे किंवा नव्या ग्रहावर जाऊन वस्ती करणे यासाठी भरपूर ऑक्‍सिजन लागेल आणि इतका साठा घेऊन जाणे शक्‍य नाही. म्हणूनच अवकाशात ऑक्‍सिजन निर्मितीवर वेगाने संशोधन होत आहे. त्यात एक संभाव्य स्रोत म्हणून धूमकेतूंकडे पाहिले जाते.

कॅलटेकमधील दोन संशोधकांनी यासाठी एक नवीन प्रक्रिया विकसित केली आहे. पाण्याचे अतिसूक्ष्म कण एखाद्या पृष्ठभागावर जोराने आदळले आणि त्या पृष्ठभागात एखादं ऑक्‍साइड असेल, तर या धक्‍क्‍याने ऑक्‍साइडमधला ऑक्‍सिजन बाहेर पडतो. त्या सूक्ष्म कणांमध्ये कार्बन डायऑक्‍साइड असेल, तर त्यातूनही ऑक्‍सिजन बाहेर पडू शकतो. सूर्य, वाऱ्याच्या प्रभावाखाली धूमकेतूंच्या शेपटीतले बाष्पकण आणि कार्बन डायऑक्‍साइड असा ऑक्‍सिजन मुक्‍त करू शकतात. पाणी आणि ऑक्‍सिजन दोन्ही देऊ शकणाऱ्या धूमकेतूंवर म्हणूनच आता पुन्हा लक्ष केंद्रित झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here