मराठा आरक्षणाच्या आड कोणीही येऊ नका!

उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरवला आहे. कोणत्याही समाजाच्या ताटातील काहीही काढून न घेता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण सरकारने दिले आहे. त्यामुळे आता कुणीही सर्वोच्च न्यायालयात जाऊन मराठा आरक्षणाच्या आड येऊ नये, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी केले. आरक्षणाच्या आड कुणी आलेच तर शिवसेना संपूर्ण ताकदीने मराठा समाजाच्या पाठिशी उभी राहिल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शिक्षण आणि सरकारी नोकरीतील आरक्षण वैध असल्याचा निकाल दिला आहे. यापार्श्वभूमीवर सरकारला मराठा आरक्षणाचा कायदा करण्यास बाध्य करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्व्यकांनी आज “शिवसेना भवन’ येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील आदी उपस्थित होते.

न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समन्वयकांनी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर ठाकरे म्हणाले, हे आरक्षण कुणाचाही हक्क हिरावून देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाऊ नका. मराठा आरक्षणाला अडसर निर्माण करू नका. मराठा आरक्षणाला विरोध करून मराठा-मराठेतर असा वाद निर्माण करू नका. उगाच लढायचे म्हणून लढू नका. सर्वांनी छत्रपती शिवरायांचे मावळे बनून एकत्र येऊन एकजूट दाखवूया, असे असे आवाहन करतानाच दिल्लीत जी काही मदत लागेल ती शिवसेना पुरवेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, समन्वकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांचेही आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.