लक्षवेधी : संख्या वाचनाचा घोळ आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ

-संजय साताळकर

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात नवे बदल करण्यात आले आहेत. 21 ते 99 हे आकडे जोडाक्षराप्रमाणे नाहीत तर संख्यावाचनाप्रमाणे शिक्षकांनी शिकवायचे आहेत, अशी शिफारस ज्येष्ठ गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केली आहे. जोडाक्षरामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन त्यामुळेच गणित या विषयाची नावड विद्यार्थ्यांच्या मनात होत असल्याचा दावा समितीने केला आहे.

सत्तेचाळीस हा अंक येथून पुढे चाळीस सात या पद्धतीने लिहावा व वाचावा असे निर्देश दिले आहेत. संख्यावाचनाच्या या नवीन पद्धतीची पाठराखण करताना समितीने इंग्रजी तसेच कन्नड तेलगू व तामिळ या दाक्षिणात्य भाषांमध्ये अशीच पद्धत असल्याची पुस्तीही जोडली आहे.

भाषाशास्त्राचा अभ्यास केला असता असे दिसून येते की, मराठी भाषा इंग्रजीपेक्षा अधिक समृद्ध आहे. मराठीच्या शब्दसंचयाच्या जवळपास देखील इंग्रजीमधील शब्दसंख्या नाही. मराठीमध्ये अनेक वस्तूंना, गोष्टींना, नात्यांना निश्‍चित असे शब्द आहेत. उदाहरणार्थ, मराठीत चुलतभाऊ, मामेभाऊ, आत्येभाऊ अशा शब्दांद्वारे आपल्या भावाशी असलेले योग्य नाते नमूद केले जाते. त्याच वेळीस इंग्रजीत या सर्व नात्यांना कझिन ब्रदर या एका शब्दांत अडकवून ठेवले जाते.

ब्रिटिश राजकारणी थॉमस बिबिंग्टन मॅकॉले 1835 साली भारतात आला असता येथील प्रभावशाली शिक्षणपद्धती आणि प्रगत अंकगणिताची जाणीव झाली; परंतु भारतीयांवर राज्य करण्यासाठी ही प्रगत शिक्षण पद्धती बाजूला सारून तुलनेने मागास पाश्‍चात्य शिक्षणपद्धती ब्रिटिशांच्या राज्यकाळात मॅकॉलेने लागू केली. आजही आपण त्याच मार्गावर जाऊन पाश्‍चिमात्यांचे अंधानुकरण करू पाहात आहोत. शून्याचा शोध लावून जगाला अंकशास्त्र शिकवणाऱ्या ह्या देशात इंग्रजीची कास धरून गणितात नवीन शिक्षण पद्धती लागू करण्याची वृत्ती पाहता नक्‍कीच मानसिक क्‍लेश होतो.

इंग्रजीमध्ये या आकड्यांना नेमके शब्द उपलब्ध नसल्यानेच बहुधा सत्तेचाळीसला फोर्टी सेव्हन म्हटले जात असावे; परंतु गणिताबरोबरच सत्तेचाळीस हा जोडाक्षर असलेला अवघड शब्द पण शिकावा लागल्याने गणित विषयाची भीती विद्यार्थ्यांमध्ये बसल्याचा जावईशोध समितीने लावला आहे.

मनुष्य ज्या अवयवाचा वापर जास्त करतो तो अधिकाधिक विकसित होत जातो. त्याचप्रमाणे ज्या अवयवांचा वापर होत नाही तो निकामी होतो अथवा गळून पडतो हे शास्त्रज्ञांनी अनेकदा सिद्ध केले आहे. आदिमानवाला असलेली शेपटी वापर नसल्याने कालांतराने नाहीशी झाली हे सर्वश्रुतच आहे. त्याचप्रमाणे सर्व सोपे करण्याच्या नादात मेंदूचा वापर कमी करून तो अवयव निकामी करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे घातक पाऊल नाही ना, अशी शंका येणे स्वाभाविक आहे. आजच्या जगात कॅलक्‍युलेटर किंवा कॉम्प्युटरचा अधिकाधिक वापर करून नवीन पिढी, मुख्यतः लहान मुले त्यांच्या नैसर्गिक क्षमता विसरत चालले आहेत. पूर्वीच्याकाळी पाढे पाठ करण्यामुळे नुसतीच स्मरणशक्‍ती न वाढता उच्चारही शुद्ध होत होते. परंतु आता कॅलक्‍युलेटरवर सात गुणिले आठ अशी बटणे दाबून पन्नास सहा असे उत्तर लिहिणाऱ्या आजच्या पिढीचे भविष्य बिघडवण्याचे काम समितीने सुरू केले आहे असेच खेदाने म्हणावे लागेल.

अवघड विषयांपासून लांब पळून सोपे ते निवडण्याची समितीची शिकवण नक्‍कीच घातक आहे. असेच धोरण अंगीकारल्यामुळे अमेरिकेतील स्थानिक विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान सर्वश्रुत आहे. तेथील शाळेतही गणित व शास्त्र विषय अवघड वाटल्यास अभ्यासक्रमातून हे विषय वगळण्याची मुभा तेथील विद्यार्थ्यांना मागील अनेक वर्षांपासून दिली गेली आणि तेथील स्थानिक तरुण आजच्या संगणक युगात मागे पडू लागले. आयटी क्षेत्रात भारत आणि चीनमधून आलेल्या अभियंत्यांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवल्या आणि सिलिकॉन व्हॅलीतून स्थानिक अमेरिकन कुटुंब हळूहळू हद्दपार होऊ लागले. मॉलमध्ये क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारात स्मार्टपणे वागणारा अमेरिकन कॅशिअर रोख रकमेच्या व्यवहारात मोड देताना हमखास चुका करतो, असा अनेकांचा अनुभव आहे.

आज आपल्या इथेही पाढे पाठ नसल्याने छोट्या-छोट्या व्यवहारात कॅलक्‍युलेटरच्या मदतीशिवाय पावलोपावली अडकणारे तरुण आपण नेहमीच पाहतो. दिवसेंदिवस फोन स्मार्ट होऊ लागले; पण ते वापरणारा माणूस मात्र आपली नैसर्गिक क्षमता विसरून मठ्ठ होऊ लागला. काही वर्षांपूर्वी अनेक फोन नंबर लक्षात ठेवणारे आपण आज आपला स्वतःचा किंवा आप्तजनांचा फोन नंबर विसरू लागलो.

वरील सर्व गोष्टींचा विचार करताना शिक्षण पद्धतीमध्ये बदल करताना व्यापक विचार होणे जरुरीचे वाटते. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी एखादा रस्ता प्रायोगिक तत्त्वावर एकमार्गी करून त्यात अडचणी वाटल्या तर पुन्हा पूर्वीप्रमाणे दुहेरी करण्याचे प्रयोग आपण नेहमीच बघत आलेलो आहोत. पण शिक्षणपद्धती बदलताना असे अल्पजीवी प्रयोग करणे नक्‍कीच घातक ठरेल.

सरकारवर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना “फडण दोन शून्य’ व बावनकुळे यांना “पन्नास दोन कुळे’ असे संबोधून ह्या निर्णयाचा फोलपणा मोठ्या खुबीने दाखवून दिला; परंतु त्याचबरोबर मागील सरकारने इयत्ता आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन मोठी चूक केली हेही भर सदनात मान्य केले. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सुरू केलेल्या कॉलेजेस्‌मध्ये विद्यार्थ्यांचे पुरेसे संख्याबळ मिळत नसल्याने दहावीचे पेपर्स सोपे काढून आणि निकालाचा टक्‍का वाढवून अनेक क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत ढकलण्याचे प्रकार आपण पूर्वीपासून पाहात आलेलो आहोत.

आज अनेक पदवीधर तरुणांचे ज्ञान नोकरीयोग्य नसल्याचे आढळून येते. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणसंख्येत भरीव वाढ झाली. पूर्वीच्या काळी 75 ते 80 टक्‍के गुण मिळवलेला विद्यार्थी बोर्डात पहिला यायचा. आज बोर्डात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची गुणसंख्या 99 टक्‍केच्या पुढेच असते. सामान्य विद्यार्थीदेखील 90 टक्‍क्‍यांच्या पुढे गुण मिळवू शकतो; परंतु गुणसंख्येतील ही वाढ त्याच प्रमाणात ज्ञानात वाढ निर्माण करू शकली नाही असेच खेदाने म्हणावे लागेल. अशा प्रकारे शिक्षण सोपे करण्याच्या नादाने शिक्षणक्रमात सर्वांगीण विचार न करता केलेले बदल नवीन पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने निश्‍चितच घातक ठरतील.

Leave A Reply

Your email address will not be published.