सोक्षमोक्ष : पंढरपुरात दुसरे विठ्ठल मंदिर?

-हरिप्रसाद सवणे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाची नगरी आणि महाराष्ट्रातील भाविकांचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पंढरपूरमधे प्रति विठ्ठल मंदिर निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमधूनही पंढरपुरात प्रति श्री विठ्ठलमंदिर किंवा दुसरे विठ्ठल मंदिर उभारल्याची बातमी रंगवली गेली. वृत्तपत्रांतूनही बातम्या आल्या. परिणामी सामान्य जनमानस आणि भोळ्या भाविक मंडळीतही आणि वारकरीवर्गात यामुळे संभ्रम निर्माण झाला; परंतु चर्चेतून निघालेले सूर आणि वास्तव यामध्ये तफावत आहे. सोशल माध्यमांवर जी चर्चा झाली ती पोकळ आणि अनाठाई वाटली. बातम्यांमधून निर्माण झालेला भक्‍तांमधील संभ्रम दूर होणे गरजेचे वाटते.

सध्या कोणत्याही तीर्थक्षेत्र किंवा देवतांविषयी नवीन मंदिरे निर्माण करून त्याला दुय्यम दर्जाचे प्रति आमुक आमुक असे नामकरण करण्याचे प्रस्थ अलीकडे वाढल्याचे दिसते. त्यातून त्या देवस्थानाला वेगळी प्रसिद्धीही मिळते हा भाग वेगळा आहे. तशी अनेक प्रति तीर्थक्षेत्रे महाराष्ट्रात प्रचलित आहेत.

मात्र, प्रति विठ्ठल किंवा दुसरे विठ्ठल मंदिर स्थापन झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर आल्या आणि त्यामुळे एक वेगळीच चर्चा निर्माण झाली. मात्र, जी चर्चा झाली ती निरर्थक आणि अनाठाई वाटली. कारण “युगेअठ्ठावीस विटेवरी उभा’ अशा सर्वमान्य विठुरायाला “प्रति’ या द्वैतवादी संकल्पनेत बसवणे हे वारकरी आणि संतविचारांना अभिप्रेत नाही आणि तेही पंढरपूर या महातीर्थक्षेत्रात? कारण वारकरी विचारधारा ही संतविचारांवर आधारित आहे.

जो सगुणही नाही आणि निर्गुणही नाही असा निराकार असणारा विठोबा “प्रति विठोबा’ या शब्दांत बसवल्यास तो कोणालाही रुजणार नाही हे सत्य आहे. तसेच पंढरपुरात किंवा कोठेही एखादे विठ्ठलाचे मंदिर निर्माण झाल्यास त्याविषयी दुसरे मंदिर निर्माण झाले असे चित्र निर्माण करण्याची गरज वाटत नाही. मुळातच विठ्ठल जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आणि सर्व प्राणीमात्रांमधे व्यापला आहे.

चर्चा झालेले आणि माध्यमांनी दाखविलेले हे प्रति विठ्ठल मंदिर पंढरपुरातील श्री विठ्ठल देवस्थानचे पारंपरिक पुजारी असणाऱ्या बडवे घराण्यातील मंडळींनी त्यांच्या खासगी जागेत निर्माण केले आहे. तेथे विठ्ठलाची दुसरी मूर्ती बसवली आहे. बडवे घराण्याचे आराध्य दैवत या नात्याने त्यांनी खासगीरीत्या सदर मूर्तीची स्थापना केली आहे आणि तो त्यांचा अधिकारही आहे याबद्दल कोणतेही दुमत नाही.

उलटपक्षी न्यायालयाने बडवे-उत्पात यांना पारंपरिक पुजारी पदावरून कमी केले. त्याठिकाणी पुजेसाठी शासकीय पुजारी नेमले. यामुळे बडवे परिवारांनी आपली विठ्ठलाची सेवा अखंड चालू राहण्यासाठी स्वतंत्र मंदिर उभारले ही अभिनंदनीय बाब आहे. खुद्द ज्यांनी मंदिर उभे केले त्या बाबासाहेब बडवे यांनी स्वत:च्या भक्‍तीसाठी आणि कुलधर्म, कुलाचार जोपासण्यासाठी हे मंदिर निर्माण केल्याचे आणि अन्य कोणताही हेतू नसल्याचे माध्यमांमधून स्पष्ट सांगितले आहे.

सर्वसामान्य ज्याप्रमाणे नवीन मंदिर स्थापन करतात त्याप्रमाणेच हे देखील आहे. त्यामुळे बडव्यांनी विठ्ठल मूर्ती स्थापन केली यामध्ये काही विशेष वाटत नाही. त्यामुळे याचा वेगळा गवगवा होण्याची आवश्‍यकताही नव्हती. मात्र, याच विठ्ठल मंदिराबाबत दुसरे एक विठ्ठल मंदिर असे संबोधले गेले आणि यामधून वादविवादात्मक मतांतरे व्यक्‍त झाली. मात्र, ही चर्चा वायफळ वाटते.

वास्तविक पाहता पंढरपुरात नवनवीन मठांची निर्मिती अव्याहतपणे चालूच आहे. तिथे विठ्ठलाची स्थापना सतत नव्याने केलीच जाते. मग बडव्यांनी निर्माण केलेल्या मंदिराविषयी एवढी चर्चा करण्याचीही आवश्‍यकता नाही. ती त्यांची खासगी बाब आहे; परंतु या मंदिराचा “विठ्ठलाचे दुसरे मंदिर’ असा भेद निर्माण केल्यास तो विवादात्मक विषय बनतो आणि असा भेद अपेक्षित नसून तो निराधार आहे. वास्तविक बडवे घराण्याचे एक विठ्ठल मंदिर यापूर्वीच अस्तित्वात आहे. बडवे या पुजारी घराण्याला त्यांचा कुलाचा, नित्योपचार, पूजापाठ पार पाडता यावा यासाठी काही वर्षापूर्वी त्यांनी खासगी जागेत विठ्ठल मूर्ती उभी केली आहे. त्याला “ताकपीटे विठोबा’ असे म्हणतात. तो भाविकांना कितपत माहीत आहे हा भाग वेगळा.

पंढरपूर शहरात प्रत्येक मठात विठ्ठल मंदिरे अस्तित्वात आहेत. जिथे नित्य धार्मिक कार्य पूजापाठ, भजन-कीर्तन, हरिपाठ आदी कार्यक्रम वर्षभर चालतात. मग त्या ठिकाणच्या विठ्ठल मंदिराला दुसरे विठ्ठल मंदिर असे का म्हणू नये? त्यामुळे केवळ बडव्यांनी एक नवीन विठ्ठल मंदिर उभारले म्हणजे त्या विठ्ठल मंदिराची तुलना मूळ विठ्ठल मंदिरासोबत कारायची हा केवळ उपद्‌व्यापच वाटतो.

शिवाय महाराष्ट्रात व भारतात गावोगावी विठ्ठल मंदिरांची कमी नाही. ती शेकडो वर्षे अस्तित्वात आहेत. तसेच दरवर्षी अनेक ठिकाणी विठ्ठल मंदिर स्थापना अव्याहतपणे चालूच आहे. मग त्या मंदिरांची चर्चाच होणार का? म्हणून याविषयी रंगवलेली चर्चा म्हणजे निव्वळ बिनबुडाची आहे. त्यामुळे दुसरे विठ्ठल मंदिर किंवा प्रतिकात्मक मंदिर अशा भूमिकेतून भक्‍तांनी या मंदिराकडे पाहू नये, असे मला वाटते. जशी पंढरपुरात अनेक विठ्ठल मंदिरे आहेत तसेच हे देखील असायला हवे.

मुळात प्रति विठ्ठल किंवा प्रति कोणतेही देवस्थान ही संकल्पनाच कितपत योग्य आहे याचा विचार होणे आवश्‍यक आहे. इ. स. च्या सुरुवातीपासूनचा इतिहास पाहिला तर अलीकडच्या वर्षांमधे प्रति देवस्थान निर्माण करण्याचे प्रस्थ आले. त्यामुळे प्रति देवस्थान ही अलीकडील संकल्पना निराधार आहे.

कुठेही एखादे देवस्थान निर्माण करून त्याला प्रति अमुक-तमुक नाव दिले जाते. तिथे भाविकांची गर्दी वाढते. तसेच त्याला प्रसिद्धी मिळते. मग ते देवस्थान खासगी असो किंवा सार्वजनिक असले तरी त्या त्या भागात त्या देवस्थानाची ओळख “प्रति देवस्थान’ म्हणूनच राहते. सध्या अस्तित्वात असलेली ही प्रति देवस्थाने मूळ देवस्थानापासून शेकडो मैल दूर आहेत. आता या ठिकाणी खुद्द पंढरपुरातच “प्रति विठ्ठल’ निर्माण झाल्याचे भासवले तर ते वारकरी विचारधारेला नक्‍कीच रुचणार नाही.

भारतात विठ्ठलाची अनेक देवस्थाने आहेत. कर्नाटकात तंजावर येथे मोठे विठ्ठल मंदिर आहे.तत्कालीन विजयनगर साम्राज्यातील हम्पी येथेही एक भव्य विठ्ठल मंदिर असून यामध्ये विठ्ठलाची मूर्तीच नाही. एवढेच वाटते की जगात कुठेही दुसरे मंदिर निर्माण झाले म्हणून मूळ अधिष्ठान असलेल्या ठिकाणचे स्थानमाहात्म्य तसूभरही कमी होऊ शकत नाही. त्याप्रमाणे पंढरीच्या महाद्वारातील कृपाळू विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढतच राहील यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.