कलंदर : आजची गरज…

उत्तम पिंगळे

विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक. फक्‍त तू मध्ये बोलणार नाहीस.जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडावर निघून जाईन. वेताळ म्हणाला, हे विक्रमा हा भारत देश नक्‍की कुठं चालला आहे ते समजत नाही. भारत विज्ञानाभिमुख व सुपर पॉवर व्हावा हे माननीय अब्दुल कलाम यांचे स्वप्न होते व त्यासाठी भारत 2020 ची आखणी त्यांनी केली होती.

पण प्रत्यक्षात काय आहे? विज्ञानात नक्‍कीच प्रगती झाली आहे पण सामाजिक स्वास्थ्याचे काय? सर्वत्र जातीपातीची आंदोलने तसेच गुन्हेगारीत झालेली वाढ, स्त्रियांवरील अत्याचाराने तर कळस गाठला आहे. सरकार असताना देशाच्या सामाजिक पातळीने हे वळण घ्यावे हे अपेक्षित नाही. त्याचप्रमाणे बॅंकांचे होत असलेले घोटाळे, मंदीकडे जाऊ पाहणारी अर्थव्यवस्था, आर्थिक वाढीचा दर न्यूनतेकडे जात आहे… हे सर्व ऐकून वेताळाला पुढे बोलू न देता विक्रम म्हणू लागला, हे वेताळा तू जे काही सांगत आहेस ते खरे आहे व तुझ्या बोलण्यातच त्याचे उत्तर लपलेले आहे.

सामाजिक व्यवस्था घातकतेकडे जात आहे याचे मुख्य कारण आर्थिक मंदी हेच आहे. अनेक कंपन्या बंद होत आहेत हे सत्य आहे. मध्यंतरी सरकारने कंपनी कर व जीएसटी वर सूट जाहीर केली होती. तसेच स्टार्टअप उद्योगांनाही प्रोत्साहन दिले आहे. अलीकडील त्या स्टार्टअपमधील तीन टक्‍के कर्जे बुडीत गेलेली आहेत. एकूण हे प्रमाण कमी असले तरीही यातून हेच दिसते की अनेकांनी त्या कर्जामधील पैसा दुसरीकडे वळवला आहे. पण या स्टार्टअपमधून नवनवीन उद्योग चालू झालेले असून रोजगार हळूहळू वाढू लागेल.

अर्थात भारतानेही काही कठोर पावले उचलणे आवश्‍यक आहे. अनावश्‍यक वस्तूंची आयात कशी बंद होईल हे पाहणे आवश्‍यक आहे. चिनी वस्तू स्वस्त कशा येतात हे ही पाहणे आवश्‍यक आहे. अशामुळे स्थानिक उद्योग बुडू लागले आहेत. जागतिक करारांमुळे आयात बंदी शक्‍य नसेल तर स्थानिक उद्योगांना सवलती देऊन त्यांचे उत्पादन कसे स्वस्त होईल हे पाहणे आवश्‍यक आहे. छोटे व मध्यम उद्योग तरणे आवश्‍यक आहे कारण तेच खरे रोजगार देणारे आहेत.

तरुण वर्ग आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण नसेल की मग त्यांचे लक्ष गैरमार्गाने पैसा मिळवण्याकडे जाते. यातूनच गुन्हेगारी निर्माण होते व गुन्हेगारीचे वेगवेगळे पैलू वाढू लागतात.म्हणूनच प्रथम रोजगार व उद्योग वाढीसाठी सरकारने पावले उचलणे आवश्‍यक आहे व उचललेली पावले धावणे आवश्‍यक आहे. तसे झाले तरच मंदीचे हे मळभ दूर होईल व एकदा ते दूर झाले की सामाजिक स्वास्थही सुधारू लागेल. विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, हे राजा तू म्हणतोस तेच सत्य आहे हे मला पटले. पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो, असे म्हणून वेताळ प्रेतासह पुन्हा पिंपळाच्या झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.