वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्टची आवश्‍यकता काय?

राज्य शासनाची महापालिकेला विचारणा

पुणे – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करून महापालिकेतर्फे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्‍यक विश्‍वस्त मंडळ (ट्रस्ट) स्थापन करण्याच्या मंजुरीसाठी महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, राज्य सरकारने विद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची आवश्‍यकता काय, अशी विचारणा केली आहे. तसेच हे विद्यालय राज्य सरकारमार्फत का चालवण्यात येऊ नये, याविषयीही महापालिकेकडून उत्तर मागवले आहे.

शहरातील नागरिकांना स्वस्त दरामध्ये वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक पर्याय निर्माण व्हावा यासाठी शहरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे यासाठी तीन पर्यायांचा विचार करण्यात आला आहे. यापैकी वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करून महाविद्यालय सुरू करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रस्टमध्ये महापालिका पदाधिकारी, अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश असेल.

महाविद्यालय चालवण्याची जबाबदारी ट्रस्टची असेल. ट्रस्टचे काम हे स्वतंत्र असणार असून, अहमदाबाद महापालिकने अशा प्रकारचे महाविद्यालय सुरू केले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम आणि प्रवेश शुल्क हे महाविद्यालय ठरवणार आहे. तर, महाविद्यालय चालवण्यासाठी होणारा खर्च आणि औषधोपचार या रकमेतून भरुन काढण्यात येणार आहे. बांधकामासाठी येणारा खर्च महापालिका सात वर्षामध्ये अंदाजपत्रकामध्ये तरतूद उपलब्ध करून देणार आहे.

महाविद्यालय ट्रस्ट चालवणार असल्यामुळे यासाठी 595 पदांची निर्मिती आणि भारती ट्रस्टच्या माध्यमातून होईल. महापालिकेने ट्रस्ट स्थापन केल्यामुळे महाविद्यालय चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा महापालिकेला सहन करावा लागणार नाही.

ट्रस्टच्या माध्यमातून हे महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याने ट्रस्ट गठीत करणे आणि त्याची कायदेशीर मान्यता सरकारकडून घेणे आदी कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी ऍड. निशा चव्हाण यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर, राज्य सरकारच्या प्रश्‍नांना आयुक्तांकडून उत्तर देण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)