शिवमोगा – कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार सध्या कॉंग्रेसच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रजा ध्वनी यात्रेवर असतानाच त्यांना पुन्हा ईडीची नोटीस जारी करण्यात आली आहे. ही माहिती त्यांनी स्वत: पत्रकारांना सांगितली.
ते म्हणाले की, मला ईडीची नोटीस जारी करण्यात आली असून माझ्या मुलीला सीबीआयची नोटीस जारी केली गेली आहे. ईडी आणि सीबीआय या संस्था केवळ विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जात असून सत्ताधारी पक्षाच्या एकाही सदस्याच्या विरोधात या संस्थांचा वापर केला जात नाही असा दावा त्यांनी केला. कॉलेज फीच्या पेमेंट सारख्या विषयावरूनही ईडीच्या नोटीसा येत आहेत हा काय प्रकार आहे असा सवालही त्यांनी केला.
ते म्हणाले की, नॅशनल हेरॉल्डला मी काय दिले त्याचीं माहिती मी ईडीला दिली आहे, आता त्यांनी पुन्हा मला याच प्रकरणात 22 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. आता मी सध्याची यात्रा पुर्ण करू की ईडीपुढे हजर राहु हेच मला कळेनासे झाले आहे. सत्ताधारी पक्षाने कोट्यवधी रूपयांचा गफला केलेला असताना त्यांना सोडून आम्हालाच या नोटीसा कशा येतात असा सवालही त्यांनी केला.
Adani Case : माकप खासदाराचा मोदी सरकारला इशारा, म्हणाले “अन्यथा मिस्टर अदानी तुम्हाला…”
जे ईडीच्या केस मधून सुटतात त्यांना सीबीआयचा सामना करावा लागतो, तेथूनही ते सुटले तर त्यांच्या मागे आयकर खात्याच्या नोटीसा लावल्या जाताहेत, असे ते म्हणाले.