नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना परकी चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लंघन प्रकरणी उद्या (गुरूवार) चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. चौकशीसाठी त्यांना दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
महुआ यांना याआधी दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, पूर्वनियोजित कामाचे कारण देऊन त्या ईडीसमोर हजर राहिल्या नाहीत. चौकशीसाठी पुढील तारीख देण्याची विनंतीही त्यांनी केली. त्यानुसार, ईडीने त्यांना नव्याने समन्स बजावले आहे.
लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून त्या वादात सापडल्या. त्यानंतर अनैतिक वर्तणुकीबद्दल त्यांची खासदारकी मागील वर्षीच्या अखेरीस रद्द करण्यात आली. त्यानंतरही तृणमूल पक्ष महुआ यांच्या पाठिशी उभा राहिला आहे.
त्यांना पश्चिम बंगालच्या कृष्णानगर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. आता ऐन प्रचाराच्या धामधुमीत त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.