नवी दिल्ली – फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत वरळीतील समुद्र महलमधील 110 कोटीचे तीन फ्लॅट, ब्रीच कँडी येथील एक फ्लॅट, अलिबाग बंगला, एक पवनचक्की आणि एक सौरऊर्जा प्रकल्पाचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पीएनबी फसवणूक –
नीरव मोदीने दुबई आणि हाँगकाँगमधील निर्यातदारांना लेटर ऑफ अंडरटेकिंगद्वारे पैसे देण्याची विनंती करून PNB ची फसवणूक केली होती. या सर्व कंपन्या नीरव मोदीच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या बनावट कंपन्या होत्या. नीरव मोदीवर 6500 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. 2018 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते, त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय वसुलीसाठी नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव करत आहे. जूनच्या सुरुवातीलाही ईडीने नीरव मोदीशी संबंधित अनेक गोष्टींचा लिलाव केला होता. यामध्ये 90 लाख रुपये किमतीच्या दोन आलिशान घड्याळांचा समावेश होता. मात्र, दुसरे एक घड्याळही 20 लाख रुपयांचे होते. अहवालानुसार, पेंटिंग्ज, घड्याळे आणि वाहनांच्या लिलावातून ईडीने सुमारे 130 कोटी रुपये वसूल केले आहेत.