नवी दिल्ली – कथित शाळा भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी ईडीच्या पथकाने शुक्रवारी पश्चिम बंगालचे मंत्री चंद्रनाथ सिन्हा यांच्या बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथील निवासस्थानी छापे टाकले.
सीआरपीएफ जवानांच्या संरक्षणात ईडीची टीम सकाळी ९.१५ च्या सुमारास सिन्हा यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि त्यांनी शोध सुरू केला.ममता बॅनर्जी सरकारमध्ये एमएसएमई आणि वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी सांभाळणारे सिन्हा छाप्याच्यावेळी त्यांच्या निवासस्थानी नव्हते. ते सुमारे ९० किमी अंतरावर असलेल्या मुराराई येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी होते.
शालेय भरती घोटाळ्यातील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात हा शोध घेतला जात आहे. सिन्हा यांना यापूर्वी गोवंश आणि कोळसा तस्करी प्रकरणी सीबीआयने समन्स बजावले होते.या कथित भरती घोटाळ्याच्या संदर्भात, लेक टाऊन, चेतला आणि बालीगंगेसह कोलकातामधील विविध भागांतील काही व्यावसायिकांच्या घरांवर ईडीने एकाच वेळी छापे टाकले होते.