प्रांत कार्यालय आवाराला बेशिस्तीचे ग्रहण

सातारा  – येथील प्रांत कार्यालयाच्या आवाराला बेशिस्तीचे ग्रहण लागल्याने कामकाज करणे अवघड झाले आहे. उखडलेले रस्ते, वेडीवाकडी पार्क करण्यात आलेली वाहने, पावसामुळे पाण्याची साठलेली डबकी व साठून राहिलेला कचरा यामुळे दैनंदिन कामासाठी येथे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पोवई नाक्‍यावरील उपविभागीय कार्यालयाच्या आवारात प्रांत, तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी, दस्त नोंदणी व विवाह नोंदणी अधिकारी तसेच स्टॅंप व्हेंडर कक्ष, अशी बरीच कार्यालये असून येथेच विद्यार्थ्यांना आवश्‍यक असणारे दाखले देणारे सेतू केंद्र आहे.

या कार्यालयाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिकांची येथे वर्दळ असते. मात्र सध्या पावसाची सुरू असलेली उघडझाप यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या समोर पाण्याचे मोठे तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या पार्किंगची प्रचंड अडचण झाली असून एखाद्या दुचाकीच्या पाण्यातून जाण्याने नागरिकांना सचैल स्नान घडण्याची आफत ओढवली आहे. पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रार्दुभाव प्रचंड वाढला आहे. संध्याकाळी येथे डासांच्या इतक्‍या झुंडी असतात की उभे राहणे मुश्‍कील होते.

प्रांत मॅडम तुम्ही तरी लक्ष द्या

साताऱ्याच्या प्रांत स्वाती देशमुख यांचा प्रशासकीय दरारा प्रचंड आहे. अत्यंत शिस्तप्रिय कामाने त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली असून कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्याविषयी आदरयुक्‍त भीती आहे. जिल्हा प्रशासनात देशमुख यांच्या नावाची वेगळी ओळख आहे. असे असताना त्यांच्याच कार्यालयात पे ऍण्ड पार्कची व्यवस्था नसल्याने मोकळ्या जागांमध्ये जुन्या वाहनांचे भंगार पडून आहे. प्रांत कार्यालयाच्या आवारातील या अव्यवस्थेच्या समस्येकडे प्रांत स्वाती देशमुख यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दलदल अन्‌ कचऱ्याची दुर्गंधी

प्रांत कार्यालयाच्यालगत मेस्को संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. सेतू कार्यालय व प्रशिक्षण केंद्र या दरम्यान संरक्षक भिंत असून येथे दररोज पडणारा कचरा साठून कुजत आहे. जुन्या वन विभागाच्या कोपऱ्यावर प्रचंड कचरा साठून त्याची दुर्गंधी नागरिकांना त्रास देऊ लागली आहे. इतकी अनागोंदी व अव्यवस्था दिसत असताना कोणाचीही तक्रार करण्याची हिंमत झालेली नाही.

उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांची कसरत

प्रांत कार्यालयात कमानीच्या आत गेलो की तुमच्या वाहनाला पर्यायाने मणक्‍याला झटके बसल्याशिवाय राहत नाही. प्रांत कार्यालयाला वर्तुळाकार वेढा घालणारा डांबरी रस्ता पूर्णतः उखडला असून येथे दुचाकी चालवणे मुश्‍कील झाले आहे. बांधकाम विभागाला अंर्तगत दुरुस्तीसाठी दोन वेळा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र प्रस्तावाचे कागद पाठपुराव्याअभावी पुढेच न सरकल्याने लाल फितीची सरकारी बाबूगिरी सुरू असल्याचे जाणवत आहे. रस्त्याची खडी इतस्तः पसरल्याने वाहने घसरून अपघाताचा धोका वाढला आहे. प्रांत कार्यालयाच्या पिछाडीच्या गेटमधून बाहेर पडल्यावर थेट पारंगे चौकाला जाता येते. मात्र गेटमध्ये मोठा खड्डा पडल्याने अपघात होण्याची भीती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.