#CWC19 : विश्वचषक स्पर्धेत आज ‘भारत-वेस्टइंडिज’ आमनेसामने

-धोनीच्या कामगिरीबाबत भारताला उत्सुकता
-आज विडींजविरूद्ध महत्त्वाची लढत

मॅंचेस्टर – महेंद्रसिंग धोनी म्हटले की हेलिकॉप्टर फटक्‍यांसह चौफेर टोलेबाजी करणारा फलंदाज असेच म्हटले जाते. मात्र, अफगाणिस्तानविरूद्ध त्याने केलेला संथ खेळ हीच भारतापुढील चिंता आहे. वेस्ट इंडिजसारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध आज तो कसा खेळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा सामन जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याच्या ध्येयाने भारत उतरणार आहे.

स्थळ- ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
वेळ- दु. 3 वा.

स्पर्धेतील बाद फेरी गाठण्याच्या विडींजच्या आशा जवळ जवळ संपुष्टात आल्या आहेत. तथापि भारताचा बाद फेरीतील प्रवेशात अडथळा आणण्याची क्षमता त्यांच्याकडे निश्‍चित आहे. न्यूझीलंडविरूद्ध त्यांच्या कार्लोस ब्रेथवेट याने शेवटच्या षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी एकहाती प्रयत्न केले होते. त्याने यापूर्वीही भारताला आपल्या झंझावती खेळाच्या जोरावर अडचणीत टाकले होते. त्याचप्रमाणे ख्रिस गेल, डॅरेन ब्राव्हो यांच्यातही सामना जिंकण्याची क्षमता आहे. शिमोरन हेटमेयर व शाय होप या धडाकेबाज फलंदाजांवर भारतीय गोलंदाज किती नियंत्रण ठेवतात याचीही उत्कंठा आहे. या खेळाडूंसह त्यांचे बरेचसे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे त्यांना भारतीय खेळाडूंचा सखोल अभ्यास आहे. शेल्डॉन कॉट्रेल, जेसन होल्डर, ओशाने थॉमस या गोलंदाजांवर त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

विडींजकडे वेगवान गोलंदाजांचा ताफा असला तरी त्यांच्याविरूद्ध भरपूर धावा घेता येतात हे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दाखवून दिले आहे. धोनी विडींजच्या माऱ्यास कसे उत्तर देतो हेच महत्त्वाचे आहे. भारताचा विक्रमवीर सचिन तेंडूलकर यानेही धोनीच्या संथ खेळाबाबत आश्‍चर्य व्यक्त केले आहे. धोनीने आक्रमक खेळण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे असाही सल्ला त्याने दिला आहे. या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, के.एल. राहुल तसेच केदार जाधव यांच्याकडून आजही सर्वोत्तम खेळाची अपेक्षा आहे.

शिखर धवनच्या जागी संघात ऋषभ पंत याला जरी येथे पाचारण करण्यात आले असले तरी कोहली व संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे त्यास अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्याबाबत फारसे उत्सुक नाहीत. जाधव याने अफगाणिस्तानविरूद्ध संघास तारले होते. त्यामुळे त्याचे स्थान निश्‍चित आहे. विजय शंकर याला विश्रांती दिली गेली तर पंत याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. जखमी भुवनेश्‍वरच्या जागी मिळालेल्या संधीचा लाभ घेत मोहम्मद शमी याने आपले स्थान निश्‍चित केले आहे. जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. हार्दिक पांड्या याने अष्टपैलू खेळ दाखवावा अशीच संघव्यवस्थापनाला अपेक्षा वाटत आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.

वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शाय होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), केमार रोच, सुनील ऍम्ब्रिस, ओशाने थॉमस.

Leave A Reply

Your email address will not be published.