पुणे – दिवाळी सणामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची तोडणी कमी केल्याने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली. आवक अत्यल्प झाल्याने सिमला मिरचीच्या भावात दुपटीने वाढ झाली होती.
तर, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने बटाटा, हिरवी मिरची, कोबी, शेवगा, गाजर, मटारच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. उर्वरित सर्व फळभाज्यांचे तेजीत असणारे भाव टिकून असल्याची माहिती
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी (दि. 7) 70 ते 75 ट्रक शेतमालाची आवक झाली.
परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 7 ते 8 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश येथून 1 टेम्पो शेवगा, गुजरातहून भुईमूग शेंग 1 टेम्पो, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची 8 ते 10 ट्रक इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1000 ते 1200 पोती, टोमॅटो 5 ते 6 हजार क्रेटस, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 5 ते 6 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, स्थानिक मटार 100 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 30 ते 35 ट्रक, आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा 30 ट्रक इतकी आवक झाल्याचे सांगण्यात आले.
फळभाज्यांचे 10 किलोचे भाव
कांदा : नवीन 100-250, जुना 200-300, बटाटा : 160-200, लसून : 250-750, आले : सातारी 150-250, भेंडी : 300-350, गवार :500-600, टोमॅटो : 300-400, दोडका : 300-350, हिरवी मिरची : 300-550, दुधी भोपळा: 150-200,
चवळी: 250- 300, काकडी : 250-200, कारली हिरवी 280-300, पांढरी 200-250, पापडी : 400-450, पडवळ: 350-400, फ्लॉवर: 150-200, कोबी : 100-200, वांगी : 300-350, डिंगरी : 300-350, नवलकोल: 120-140, ढोबळी मिरची: 700-800,
तोंडली: कळी 350-450, जाड, 200-220, शेवगा: 900, गाजर 300-350, वालवर 400-450, बीट: 200-250, घेवडा : 500-550, कोहळा : 100-150, आर्वी: 300-350, घोसावळे : 200-250, ढेमसे: 250-300, भुईमुग शेग : 350-450, मटार: स्थानिक: 1600-1800, पावटा: 500-600, तांबडा भोपळा: 60-100, सुरण: 180-200, मका कणीस : 60-100, नारळ: शेकडा 1000-1600.