सातारा – सातारा नगरपरिषदेचे पदाधिकारी, विभागप्रमुखांची सोमवारी बैठक घेऊन खा. उदयनराजे भोसले यांनी शहरातील विविध कामांच्या सद्य स्थितीचा आढावा घेतला.
जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावे. करोनाविरोधात सध्या सुरू असलेल्या लढाईत विकासकामांच्या पाठपुराव्यास मर्यादा येत आहेत; परंतु कालबद्ध नियोजन करून ही कामे मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
खा. उदयनराजे, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी युनियन क्लब, यादोगोपाळ पेठेतील बगीचा, पालिकेच्या जुन्या इमारतीतील आर्ट गॅलरी, सदाशिव पेठ भाजी मंडई, करंजे येथील पाण्याची टाकी, नवीन शाळा, माजगावकर माळावरील घरकुल योजना, हुतात्मा स्मारक, करिअप्पा चौकाचा विकास, कमानी हौद सुशोभिकरण, पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, कर्मवीर हाऊसिंग सोसायटीतील मेडिटेशन हॉल आदी प्रस्तावित व सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. युनियन क्लबच्या मागे पालिकेची 57 गुंठे मोकळी जागा आहे. या जागेचा योग्य उपयोग करण्यासाठी क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी करून नियोजन करा. या मोकळ्या जागेच्या विकासाबरोबर युनियन क्लबची नवी इमारत बांधता येईल.
यादोगोपाळ पेठेत प्रस्तावित प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज बगीच्याजवळून वाहणाऱ्या ओढ्याला रिटेनिंग वॉल बांधण्यात आली आहे. तेथील जागेच्या चढउताराचा फायदा घेऊन लॅंडस्केपिंगचे डिझाइन करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर सातारकरांना देखण्या गार्डनचा लाभ घेता येईल. या कामाच्या तांत्रिक मंजुरीसाठी निधीची तरतूद तातडीने करा, अशा सूचना उदयनराजे भोसले यांनी दिल्या.
पालिकेच्या जुन्या इमारतीच्या वर मजला चढवून आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे. जुन्या इमारतीचा 20 फुटांचा दर्शनी भाग रस्ता रुंदीकरणात जाणार असल्याने तेथील वळणावरचा रस्ताही रुंद होणार आहे. त्याशिवाय नागरिकांना विविध कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी चांगली वास्तू मिळेल, असे ते म्हणाले. पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेची मोजणी सोमवारपासून सुरू करण्यात आली. त्याचीही पाहणी उदयनराजे यांनी केली.