पूर्वीची घंटागाडीच बरी!

गल्लीबोळातील कचरा गोळा करताना अडचण

घरोघरचा कचरा गोळा करण्यास हरताळ

महापालिकेने केलेल्या करारानुसार ठेकेदाराने घरोघरी जावून कचरा गोळा करणे बंधनकारक आहे. मात्र, छोटा हत्ती या वाहनावरील ठेकेदाराचे कर्मचारी गाडीतून खाली उतरत नाहीत. शिट्टी वाजवून नागरिकांना कचरा टाकण्याच्या सूचना करतात. बऱ्याचदा शिट्टी वाजविली देखील जात नाही. त्यामुळे कचऱ्याची गाडी कधी आली आणि गेली याचा तपास लागत नाही. एवढेच नव्हे तर या कर्मचाऱ्यांना पुढे निघून जाण्याची घाई असते अशा वेळी कचऱ्याचे डब्बे हातात घेवून महिला वर्ग वाहनाच्या मागे धावत असल्याचे चित्र सर्रास पहायला मिळत आहे.

चिंचवड – घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी महापालिका वर्षाकाठी ठेकेदाराला कोट्यावधी रुपये मोजते. ठेकेदारामार्फत छोटा हत्ती या वाहनाद्वारे कचरा गोळा केला जातो. मात्र, अरुंद गल्लीबोळात हे वाहन पोहचत नसल्याने चिंचवडकरांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.

शहराची स्वच्छ शहरांच्या यादीत कायम पिछाडी होत आहे. शहरातील सर्व भागात कचरा गोळा करणारी वाहने पोहचत नसल्याचे मुख्य कारण त्यामागे आहे. दाटवस्तीच्या भागामध्ये अरुंद गल्लीबोळ आहेत. अशा ठिकाणी हे वाहन पोहचणे दिव्य ठरत आहे. अशा ठिकाणी नागरिकच मुख्य रस्त्यावर येवून कचरा टाकतात. 1997 साली महापालिकेच्या तत्कालीन महापौर अनिता फरांदे यांनी शहरामध्ये घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीचा प्रयोग यशस्वीरित्या राबविला. त्यामुळे त्यावेळी शहरात स्वच्छता दिसत होती.

कालांतराने घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांनी पालिकेत समावेश करावा, अशी मागणी पुढे केली. घंटागाडी बंद झाल्यानंतर चिंचवड परिसरातील पारिजातबन, सुदर्शन नगर, लक्ष्मीनगर, दर्शन हॉल, तानाजी नगर, केशवनगर, चिंचवडगाव, चिंचवडेनगर, बळवंत कॉलनी, औदुंबर कॉलनी, शिवसाई कॉलनी आदी भागात महापालिकेने छोटा हत्ती कचऱ्याची गाडी सुरु केली. परंतु, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी काही भागात अरुंद गल्लीबोळ असून कचऱ्याची गाडी अनेक वेळा सकाळच्या वेळेला फिरकतच नाही. चाळीत व गल्लीबोळात नंतर असलेल्या चाळीतल्या रहिवाश्‍यांना कचऱ्याची गाडी कधी येवून गेली, हे कळतच नाही. त्यामुळे घरातील कचऱ्याची विल्हेवाट आपल्या परीने करीत आहे.

अनेक ठिकाणी छोटा हत्ती असलेली कचऱ्याची गाडी जावूच शकत नाही, सध्या कचऱ्याची गाडी जागो-जागी थांबून हॉर्न वाजवतात, हॉर्नचा आवाज ऐकून महिलांना कळते, की कचऱ्याची गाडी आलेली आहे. काहीजणांचा कचरा गाडीत टाकला जातो. ज्यांना आवाज ऐकू नाही, अशांचा कचरा पुन्हा घरातच शिल्लक राहतो. या सर्व प्रकारामुळे महिला वर्गात तीव्र संताप आहे. आदल्या दिवशीचा दिवसभराचा कचरा दुसऱ्या दिवशी एक ते दीड वाजेपर्यंत घरातच पडून राहतो. गाडी आली का नाही, याचीच वाट पाहण्याची वेळ महिला वर्गावर येत आहे. यासाठी घंटागाडी हा योग्य पर्याय असून चिंचवड परिसरात पूर्वी प्रमाणेच घंटागाडीद्वारे सकाळी 7 ते 9 या काळातच घरोघरी कचरा गोळा करावा, अशी प्रमुख मागणी महिला वर्गांची आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.