बेकायदा खानावळी झाल्या उदंड

सर्व नियम धाब्यावर ः सुरक्षितता, आरोग्याशी होतोय खेळ
बेकायदा खानावळी झाल्या उदंड
दर आकारणीत मनमानी

प्रत्येक खानावळीत जेवणासाठीचे वेगळे दर आकारले जातात. या दरांवर कोणाचेही निर्बंध नाही. त्यामुळे एकीकडे शासनाचा महसूल बुडत असताना दुसरीकडे गरजूंची अडवणूक होत आहे. दर आकारणीच्या तुलनेत अन्न पदार्थांचा दर्जाही मिळत नाही. बाजारपेठेत स्वस्त असलेल्या भाज्यांचा मारा केला जातो. भाजी विक्रेत्यांकडून उरलेला, टाकाऊ भाजीपाला विकत घेवून अधिकचा नफा कमविण्याचा फंडा अनेक खानावळ चालक राबवत आहेत.

पिंपरी – आयटी पार्क, मोठमोठ्या शिक्षण संस्था, कंपन्यांमुळे शहरात खानावळींचा धंदा जोरात आहे. मात्र, या खानावळींची शासकीय दप्तरी स्वतंत्र नोंद नाही. खाद्यपदार्थाची गुणवत्ता, अस्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर आहे. भर नागरी वस्तीत असलेल्या या खानावळींनी सुरक्षिततेचे नियम देखील धाब्यावर टाकले आहेत.

पिंपरी-चिंचवडला कामगारनगरी असे संबोधले जाते. पूर्वी केवळ येथील कामगार वर्ग आणि काही प्रमाणात विद्यार्थी वर्ग हा खानावळींवर अवलंबून असायचा. खानावळीसारख्या घरगुती व्यवसायातून अनेकांचे संसार उभे राहिले. मात्र, सध्या खानावळींना पूर्णतः व्यावसायिक स्वरुप आले आहे. त्यांच्यामध्ये तीव्र स्वरुपाची स्पर्धा आहे. त्यामुळे खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. हिंजवडी, तळवडे आयटी पार्क, उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांचा शहरातील वाढता पसारा त्याचबरोबर परगावातून आलेला कष्टकरी वर्ग खानावळींचा आधार घेत आहेत. त्यामुळे कोणी, केव्हा आणि कुठे खानावळ सुरू करावी याला काहीही नियम राहिलेला नाही. कोणतीही परवानगी घ्यायची नाही, नियम पाळायचे नाहीत. केवळ “येथे खानावळ सुरू आहे’, अशी पाटी लावून व्यवसाय सुरू केला जातो.

सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर
शहरातील भर नागरी वस्तीमध्ये काहींनी घरगुती तर काही ठिकाणी गाळ्यांमध्ये खानावळ थाटली आहे. शेजारी-शेजारी अनेक खानावळ पहायला मिळतात. संत तुकारामनगर, भोसरी, निगडी, आकुर्डी, सांगवी सारख्या परिसरात एका दिवसाला शेकडो जणांचे जेवण तयार केले जाते. मात्र, खानावळींचा फेरफटका मारला असता सर्रास घरगुती वापराच्या सिलिंडरचा वापर होत असल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा साठा केला जातो. सर्रास काळ्या बाजाराने हे सिलिंडर घेतले जातात, असा आरोप सर्वसामान्य करीत आहेत. खानावळींमध्ये दिवसभर अन्न पदार्थ शिजविण्याची लगबग असते. मोठमोठ्या शेगड्यांवर भाज्या शिजविल्या जातात. त्यामुळे येथील स्वयंपाकगृहात कायम तीव्र उष्ण वातावरण असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे आग लागण्यासारख्या घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे खानावळींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा औषधालाही मिळत नाही.

अस्वच्छतेचे आगार
अस्वच्छतेने कळस गाठल्याचे खानावळींच्या स्वयंपाकगृहांमध्ये पहायला मिळते. अन्न पदार्थ झाकून ठेवले जात नाहीत. खानावळीत दुपारी व रात्री पंगती पडतात. एक पंगत झाली की स्वच्छता न करताच दुसरी पंगत बसविली जाते. जेवणाच्या गरजेपोटी त्याकडे दुर्लक्ष करुन गरजू दोन घास आपल्या पोटात ढकलतात. जेवण वाढण्यासाठी वापरली जाणारी भांडी केवळ पाण्यातून विसळून नंतर कापडाने कोरडी करुन पुन्हा जेवणासाठी मांडली जातात. सोडा, खाण्याचे रंग याचा सर्रास अन्न पदार्थांमध्ये अतिरिक्त वापर केला जात आहे. तळणीच्या पदार्थांसाठी वापरले जाणारे तेल पुन्हा पुन्हा वापरले जाते.

आरोग्याशी खेळ
खानावळींकडून चिमणी, धुराडींऐवजी एक्‍झॉस्ट फॅनचा वापर केला जातो. शिजवलेल्या अन्न पदार्थाच्या गरम वाफा, धूर यातून बाहेर पडतो. त्याचा परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रदूषणातही भर पडत आहे. महापालिका घरगुती आणि हॉटेलमधील कचरा स्वतंत्रपणे गोळा करते. त्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना जास्तीचे दर आकारले जातात. मात्र, खानावळी घरगुती कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांमध्येच उरलेले अन्न पदार्थ, कचरा टाकतात. बहुसंख्य खानावळींचा कचरा उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो. अन्न औषध प्रशासनासह महापालिकेचेही या खानावळींकडे दुर्लक्ष झाले आहे.

कोणत्याही प्रकारच्या खाद्य पदार्थ विक्रीसाठी परवाना हा घ्यावाच लागतो. विना परवाना खानावळ चालविणे बेकायदेशीर आहे. खाद्यपदार्थांचा दर्जा, पिण्याचे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता हे सर्वसामान्य नियम पाळणे बंधनकारक आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना देखील गरजेच्या आहेत. ऑनलाईन फूड डिलेव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील एफडीएचा परवाना सक्तीचा केला आहे. त्यामुळे खानावळ तसेच डब्बे पुरविणाऱ्यांना परवाना गरजेचा आहे.

– संजय नारागुडे, सहाय्यक आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन, पुणे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.