इस्लामाबाद – पाकिस्तानच्याकाही भागांमध्ये आज भूकंपाच्या 6.0 क्षमतेचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि सुरक्षेसाठी लोकांनी घरांच्या बाहेर पळ काढला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान आणि ताजिकीस्तानच्या सीमाभागात जमिनीखाली 223 किलोमीटरवर होता. इतक्या खोलीवर केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाची तीव्रता सर्वसाधारणपणे खूप सौम्य होत जाते, असे अस्लामाबादेतील राष्ट्रीय भूगर्भशास्त्र संस्थेने म्हटले आहे.
इस्लामाबाद, पेशावर, स्वात, हरिपूर, मलाकंद, अबोटाबाद, बटग्राम, पाकव्याप्त काश्मीर, टेक्सलिया, पिंड दादन खान आणि देशाच्या इतर भागांमध्ये हे धक्के जाणवले. या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पाकिस्तानच्या वेगवेगळ्या बागांमध्ये नेहमी कमी-अधिक क्षमतेच्या भूकंपाचे धक्के जाणवत असतात. पाकिस्तानमध्ये 2005 साली झालेल्या भीषण भूकंपात 74 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.