कुरकुंभ, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील अर्थकेम लॅबोरेटरीज ही कंपनी विनापरवाना सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक अंकुश खराडे यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील साबळे याची कुरकुंभ येथे मंगळवार (दि.२०) प्लॉट नंबर ए ७० या कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली होती. हा सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये सापडलेल्या ड्र्ग्जप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहीती समोर आली आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील ज्या प्लॉट ए ७० मधील अर्थकेम लॅबोरेटरीजमध्ये ड्रग्स बनविले जात होते. त्या प्लॉट ए ७० ची कोणतीच नोंद औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाकडे नसून ती विनापरवाना सुरू असल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक अंकुश खराडे यांनी दिली. त्यामुळे ड्रग्स प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
दरम्यान, कुरकुंभ एमआयडीसीची ओळख आता ड्रग्सचे आगार म्हणून निर्माण झाली आहे. त्यातच या कंपनीतील ड्रग्स थेट परराज्यात पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.