नाशिक – सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील आदिमा प्रायव्हेट लिमटेड या कारखान्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या कारखान्यात झालेल्या स्फोटांमुळे एमआयडीसी परिसर हादरला असून संपूर्ण एमआयडीसी परिसरात धुराचे लोळ पसरल्याचे चित्र होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुपारच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली. आकाशात सर्वत्र आगीचे लोळ सर्व दूरदूरपर्यंत दिसत असल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती कळताच सिन्नर नगर परिषद आणि एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे.
#WATCH | Maharashtra | Fire broke out in a factory in the industrial area of Sinnar, Nashik. Fire tenders are present at the spot.
(Source: Police) pic.twitter.com/8PxUBP4wIF
— ANI (@ANI) February 2, 2024
आग लागलेल्या ठिकाणी अधून मधून स्फोटाचे आवाजही येत असल्याचे दिसत होते. सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकरण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर हे घटनास्थळी तळ ठोकून होते.
अग्निशामक बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन जवानांनी केले. आग कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. ही आग अतिशय भीषण असल्याने आगीचे लोळ 10 ते 15 किलोमीटरवरून दिसत होते.