पृथ्वी शॉ पुनरागमन करणार

मुंबई: भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घातलेल्या बंदीची मुदत येत्या 15 नोव्हेंबरला संपत असून तो लवकरच देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. मात्र त्याचवेळी शॉवर लावलेल्या 8 महिन्यांच्या बॅकडेटेड बंदीवरून अनेक प्रश्‍न निर्माण होऊ शकतात व मंडळच अडचणीत येऊ शकते.

उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे शॉ याच्यावर आठ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई मंडळाने केली होती, मात्र ही बंदी व त्याचा कालावधी बॅकडेटेड होता. एप्रिल महिन्यातील तारखेने त्याच्या बंदीचा कालावधी नोव्हेंबरमध्ये संपणार असला तरी प्रत्यक्षात शॉ याने एप्रिल व मे महिन्यात आयपीएल, तसेच मुंबई क्रिकेट लीग आणि काही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळ केला आहे, मग त्या कामगिरीची नोंद होणार का किंवा एकूणच ही बॅकडेटेड बंदी का लावली गेली.

या व अशा अनेक प्रश्‍नांना आता मंडळाला सामोरे जावे लागणार आहे. शॉ सय्यद मुश्‍ताक अली स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी मुंबईच्या संघात पुनरागमन करण्याची शक्‍यता, संघटनेच्या निवड समितीचे प्रमुख मिलिंद रेगे यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईने फक्त पहिल्या तीन सामन्यांसाठीच संघ जाहीर केला आहे. त्यामुळे भारत-बांगलादेश मालिका संपल्यानंतर आम्ही काही प्रमुख खेळाडूंची मुंबईच्या संघात निवड करू. त्याशिवाय पृथ्वीचे निलंबन संपल्यानंतर लगेचच त्यालाही संघात सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही रेगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.