आळेफाटा – जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. ही घटना तिन ते चार दिवसांपूर्वी घडली असल्याचं वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
जुन्नर तालुका हा बिबट्याप्रणव क्षेत्र असलेला तालुका असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबटे विहिरीत पडण्यासारख्या घटना घडत आहे.
दरम्यान, अशीच एक घटना चाळकवाडी येथे दिसून आली आहे. शेतकरी महादेव सोनवणे व भागाजी सोनवणे यांच्या घरच्यांनी (दि.२६) सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत बिबट्या म्रुत अवस्थेत पडलेला दिसून आला.
याबाबतची माहिती सोनवणे यांनी वनखात्याला दिली असता वनखात्याचे अधिकारी व रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्या भक्षाच्या शोधात विहिरीत पडला असण्याची शक्यता वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.