छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) – गौतमी पाटीलच्या लावणीने अल्पावधीतच अनेकांना वेड लावले आहे. सध्या तिच्या लावणीची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे दिसते. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. लोक लांबून लांबून गौतमीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशात कार्यक्रम पाहायला आलेल्या अति उतावीळ प्रेक्षकांमुळे कार्यक्रमाच्या बाजूला असलेले शेड कोसळल्याची दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हंटल कि, गर्दी होणारच अशात कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हंटल्यावर पाहणाऱ्यांचा आणखीनच उत्साह वाढला. वैजापूर येथे पार पडलेल्या गौतमीच्या कार्यक्रमात एक छोटी दुर्घटना घडल्याचे समोर आले. कार्यक्रमात राती अर्ध्या राती हे गाणं सुरु होत अशात समोर पत्र्याच्या शेडवर चढून पाहणारे नाचायला लागले आणि शेड कोसळलं.
तसही गौतमीचे कार्यक्रम नेहमीच चर्चेत राहतात. हा कार्यक्रम देखील शेड कोसळल्याने चांगलाच चर्चेत आला. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले. मात्र यावेळी प्रेक्षकांचा उत्साह मात्र कमी झाला नाही. महालगाव येथील स्टँड जवळ हा कार्यक्रम पार पडला. शेड कोसळल्याची चर्चा मात्र पंचक्रोशीत पसरली.
या कार्यक्रमाचा शेड कोसळल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जमावाला पांगवल्याचे देखील काही स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चा आणि गौतमी पाटील हे समीकरण असच सुरु राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.